नाशिक : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघात (इस्कॉन) श्री राधाष्टमी अर्थात श्रीमती राधाराणीचा जन्मदिवस ‘राधे राधे’च्या जयघोषात रविवारी (ता. ४) झाला. दिवसभर झालेल्‍या धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी उत्‍स्‍फूर्तपणे हजेरी लावली. श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर होणारा हा दुसरा मोठा उत्‍सव असून, यानिमित्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. 

राधाष्टमीनिमित्त मुंबईहून शिवराम प्रभू नाशिकला आले होते. ते प्रवचनात म्‍हणाले, की श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करणे अतिशय कठीण आहे. मात्र, राधाराणीची कृपा एखाद्या व्यक्तीवर झाल्‍यास, त्या व्यक्तीला श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करणे सुलभ होते. राधाराणीच्या कृपेची याचना करत कुणी अश्रू ढाळल्‍यास त्याला आयुष्यभर दुःखाश्रू ढाळावे लागणार नाही.

राधाराणी व श्रीकृष्ण यांच्यातील प्रेम भौतिक स्तरावरील नसून आध्यात्मिक स्तरावरील आहे. 

महोत्सव यशस्वितेसाठी मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन प्रभू, उत्सव समितीप्रमुख लीलाप्रेम प्रभू व अच्युतप्राण प्रभू, गोपालानंद प्रभू, रणधीर कृष्ण प्रभू, सार्वभौम कृष्ण प्रभू, मारुतीप्राण प्रभू, आनंदचैतन्य प्रभू, सुमेध पवार, अकिंचन दास, सेवाप्रमुख नादियाकुमार दास, तुलसीसेविका माताजी, प्रिया गोरे माताजी आदींनी परिश्रम घेतले.

दिवसभर धार्मिक कार्यक्रम

राधाष्टमीनिमित्त मंदिराची, तसेच श्री राधाकृष्णाच्या विग्रहांची सजावट केली होती. महोत्सवाला सकाळी पाचपासून मंगल आरतीने सुरवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जाप, दर्शन आरती व श्रीमद्‍भागवत प्रवचन झाले.

राधाराणीचे गुणगान करणारे राधिकाष्टकमचे स्तवन, तसेच अन्य व्रजभक्ती गीते सादर करण्यात आली. श्रीश्री राधा-कृष्णाच्या विग्रहांचा दुपारी पंचामृताने अभिषेक केला. अभिषेकानंतर महाआरती व महाभोग अर्पण केला. दुपारी बाराला ५६ भोग श्रीमती राधाराणीला अर्पण करण्यात आले व महाआरती झाली.