सरकार एकीकडे वृक्ष लागवड मोहीम राबवणासाठी आटापिटा करत असताना शिऊर परिसरात सर्रासपणे अवैधरित्या वृक्षतोड सुरू असून यात वन विभागाचा देखील सोयीस्कर कानाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी सकाळी शिऊर ते शिऊर बंगला मार्गावर तोडलेले झाड रस्त्यावर पडलेले आढळून आले. वृक्ष तस्करांनी कडू निंबाचे झाड कदाचित पहाटे तोडले असावे मात्र झाड कापण्याचे मशीन बंद पडून अथवा कुणाच्या तरी भीतीने अर्धवट सोडून पळ काढला असावा असा कयास लावला जात आहे. शिऊर येथील माजी उपसरपंच रामेश्वर जाधव हे बंगला येथे जात असताना त्यांना सकाळी नऊ वाजता जुने कडू निंबाचे झाड तोडून रस्त्यात पडलेले दिसले.
राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होणार असले तरी मार्गा लगत असलेले झाडे तोडण्याचे काम सुरू झाले नसल्याने वृक्षतोड तस्कराने हा प्रकार केला असल्याची खात्री पटल्याने त्यांनी वनपाल श्रीमती सपकाळ यांना कॉल करून माहिती दिली. त्यानंतर तीन तासांनी वनरक्षक श्रीमती वनरक्षक एस व्ही मुंडे यांनी पंचनामा केला. दरम्यान रस्त्यावर झाड तोडून टाकल्याने रहदारीला अडचण निर्माण झाली होती. काही वाहनधारकांनी स्वतःच्या हातानेच झाडाच्या फांद्या रस्त्याच्या बाजूला केल्या.अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी शंकर कहाटे यांनी यांनी सांगितले.