शिरुर :-ऑनर किलिंगच्या घडणाऱ्या घटनांचा जर विचार केला असता आपण जर बारकाईने या घटनेचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की आपला भारतीय समाज हा होऊ घातलेला किंवा होत असणारा सामाजिक बदल रोखण्याचा प्रयत्न करत आहे. यातून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आपल्याला वाहत्या पाण्याबरोबर वाहण्याची सवय नाही किंवा वाहत्या पाण्याबरोबर वाहत जाणं आपल्याला आवडत नाही. म्हणजे आपल्याला बदल नको आहे. "ठेवले जैसे अनंत रहावे चित्ती असावे समाधान" या उक्तीप्रमाणे वागणारी लोकं आहोत आपण.सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजेत या विचारांवर सर्व समाजातील पुढारी लोकांचं किंवा त्या त्या समाजातील पुढारी लोकांचं एकमत आहे. पण सामाजिक सुधारणा ज्या वेळेस करण्याची वेळ येते त्यावेळेस त्या वेळेस ही सर्व माणसं अदृश्य होतात. आम्हाला जाती धर्माच्या नावाने राजकारण करायला आवडतं पण जाती धर्मात सुधारणा करायच्या म्हटल्या की आमचं तोंड वाकडं होतं.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. जात-धर्म ही आपल्या देशातील राजकीय लोकांची बेस्ट स्ट्रेंग्थ आहे. जाती धर्माच्या नावाशिवाय आपलं भारतीय राजकारण होऊच शकत नाही हे इथल्या राजकीय पक्षांना चांगले माहीत आहे. ही जाती व्यवस्था जर कोलमडली किंवा यात सुधारणा झाली तर भारतीय राजकारणाचा चेहरा मोहरा पूर्ण बदलून जाईल. लोकांना जातीमध्ये रहायला आवडतं, जातीच्या लोकांसोबत व्यवहार करायला आवडतो, आपल्या जातीचा आहे म्हटलं की नात्यांमध्ये विश्वास आपोआपच निर्माण होतो. हे विधिलिखित कटू सत्य आहे. जिथे जातीची माणसं नाहीत तिथे ओळखीच्या माणसांवर विश्वास असतो आणि तिथे जातीची माणसं आहेत तिथे ओळखीच्या माणसांची गरज नाही. असं एकंदरीत भारतीय जातीवस्थेचं समीकरण आहे. दुसऱ्या जातीच्या माणसांवर आपण विश्वास ठेवत नाही किंवा असला तरी तो खूप कमी प्रमाणात किंवा गरजेपुरता असतो. एक शब्द समाजात वारंवार वापरला जातो तो म्हणजे 'त्याला जवळ केला पण शेवटी तो जातीवरच गेला' इथल्या प्रत्येक जातीचं एक वैशिष्ट्य आहे, एक स्वभाव आहे. लोकांना ही ओळख सोडायची नाहीये. त्यांना बदलायचं नाहीये. ही जातीव्यवस्था समाजात आपण सर्व एक आहोत असं वरवरचे दाखवायच्या प्रयत्न जरी करत असली तरी ती तशी नाहीये. ती एकता फक्त व्यवहारिक आहे. ही व्यवहारिक एकता कुठले नवीन नाते संबंध तयार करत नाही. भारतीय जातीव्यवस्थे मधील माणसं ही फक्त स्वतःच्या दैनंदिन गरजे पुरतीच एकत्र येतात. ते तुमच्याशी कुठले नाते संबंध जोडणार नाहीत फक्त वस्तूंच्या देवाणघेवाण करण्यापूर्तीच त्यांची एकता आहे.

हजारों वर्षांपासून जी समाजीक व्यवस्था तयार झाली आहे. त्या व्यवस्थेच ते जगत आहेत. आपल्या जातीच्या समूहाला चिकटून राहण्याची सवय, इतर जातींच्या लोकांवर गरजेपुरताच विश्वास ठेवणे यापलीकडे दुसरे काही घडत नाहीये. सर्वच जातीच्या लोकांनी स्वतःभोवती एक कुंपण तयार केलय आणि स्वतःला त्यात कैद करून घेतलय. त्यांना त्या कुंपणातून बाहेर पडायचं नाहीये , स्वतःला बदलायचं नाहीये. आणि जो कोणी हे जातीचं कुंपण तोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल त्यांचा काटा काढल्याशिवाय ही जातीयवादी माणसं शांत बसत नाही. त्यांना या व्यवस्थेला बदलायचं नाहीये. आपल्याला फक्त जातीच्या नावाने राजकारण करायचं आहे. जातीव्यवस्था कशी वाईट आहे त्याने कसं समाजक नुकसान झालं आहे हे फक्त बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून लोकांना सांगायचं आहे. पण प्रत्यक्षात मात्र ज्या वेळेस एखादी सामाजिक भूमिका घेण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र हे सो कॉल्ड सुधारणावादी लोकं अदृश्य होतात. या जातीयवादी सामाजिक मानसिकतेमुळे भारताला २१व्या शतकातल्या ततरुणांचं आयुष्य उध्वस्त झालं आहे. या जातीयव्यस्थेने स्वतः भोवती निर्माण केलेलं जातीय कुंपण हा तरुण तोडू इच्छित आहे. त्यातून तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. या जातीयवादी लोकांना नवा सामाजिक दृष्टिकोन, नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करतोय पण ही जातीयवादी माणसं हा प्रयत्न हाणून पाडत आहेत. साम दाम दंड भेद या सर्व नीतीचा उपयोग करून समाजव्यवस्थेत होऊ घातलेला हा बदल जातीयवादी माणसं हाणून पाडत आहेत.

त्यामुळे भारतीय तरुणांचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज भारतीय तरुण तरुणी अस्वस्थ आहेत. असुरक्षित आहेत. त्यांना त्यांचं आयुष्य हे त्यांच्या आवडीनिवडीनुसार जगता येत नाहीये. पूर्वी लोकांचा कामा पुरताच संपर्क असायचा. शिक्षण न्हवतं, मोठमोठ्या शाळा महाविद्यालये न्हवती. आणि सगळ्यांनाच शिकण्याचा अधिकार देखील न्हवता. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याकाळी शिक्षणाची ही एवढी गरज न्हवती. माणसं काम करून पोट भरत होती. पण २०व्या शतकाच्या मध्यानंतर म्हणजे आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर खूप मोठा बदल घडून आला. सर्वांना समानतेने वागवण्याची जवाबदारी हे विधिपूर्वक कर्तव्य या शासन व्यवस्थेवर संविधानाने टाकले. समानतेचं बीज भारतात संविधानाने रोवलं. आपण अजून जरी आपल्या जातीय मानसिकततेतून वागत असलो तरी ते वागणं संविधानाच्या म्हणजे भारताच्या मूळ कायद्याच्या विरोधातलं आहे. संविधानाने सर्व जातीधर्माच्या लोकांना समानतेचे अधिकार दिले. प्रत्येक भारतीय नागरिकाला दैनंदिन जीवनात त्याच्या जगण्याशी निगडित असणाऱ्या घटकांचा त्याला उपभोग घेता यावा, त्यात सहभाग घेता यावा म्हणून संविधानाने कुठलाही पक्षपातीपणा न करता सर्वांना समान मूलभूत अधिकार दिलेत. संविधानाने सर्व नागरिकांना स्त्री असो कि पुरुष सर्वांना समान अधिकार दिले आहेत.

सर्व भारतीय नागरिकांना कायद्यापुढे समानता, बोलण्याचा, लिहिण्याचा व्यक्त होण्याचा , एकत्र येण्याचा समान अधिकार, जगण्याचा अधिकार व वयक्तिक स्वातंत्र्य हे सर्व मूलभूत अधिकार दिले आहेत. शिक्षण घेणे हा प्रत्येक भारतीय नागरीकाचा मूलभूत अधिकार आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या त्याच्या आयुष्याशी, जगण्याशी निगडित असणाऱ्या प्रत्येक घटकाची निवड करण्याचं, नाकारण्याचं स्वातंत्र्य आहे. प्रत्येक नागरिकाने त्याचं आयुष्य कसं जगायचं हे ठरवण्याचा अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीने विवाह त्यांच्या पसंतीच्या व्यक्ती सोबत करणे किंवा स्वतःच्या पसंतीने करणे हा सुध्दा त्याचा मूलभूत अधिकार आहे. संविधानाने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार हे त्यांच्या कडून कोणीच काढून घेऊ शकत नाही. पण हा भारतीय तरुणांचा मूलभूत अधिकार जातीयवादी मानसिकतेने जगणारी माणसं काढून घेत आहेत. भारतीय तरुणाचं निवडीचं स्वातंत्र्य ही जातीयवादी मानसिकतेची माणसं काढून घेत आहेत. त्यामुळे भारतीय तरुणाचं आयुष्य धोक्यात आलं आहे. त्यांचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

२०२१ मध्ये केंद्र सरकारचे गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी लोकसभेत बोलताना त्यांनी माहिती दिली की २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत भारतात १४५ ऑनर किलिंगच्या घटना घडल्या. या सर्व ऑनर किलिंगच्या घटनांचा संबंध जातीय मानसिकतेशी होता. ज्या तरुण मुलामुलींनी आंतरजातीय विवाह केला आहे त्या सर्व जोडप्यांची हत्या करण्यात आली होती. यासर्व हत्या जातीव्यवस्थेचे परिणाम आहेत. माणसापेक्षा दुसरा माणूस तर लांब राहिला स्वतःच्या मुलामुलींना जीवे मारताना यांना थोडी सुद्धा त्यांची किव आली नाही. थोडी सुद्धा अपराधीपणाची भावना त्यांच्या मनात आली नाही. आपल्या मुलांच्या जीवा पेक्षा त्यांना त्यांची जात महत्वाची आहे. जातीयवादी मानसिकतेने जगणारी माणसं ही छुपे आतंकवादी आहेत. त्यांच्या हातात जातीचं शस्त्र आहे. जातीयवादी माणसं ही जिहादी आहेत. त्यांची जात टिकली पाहिजे. त्यांच्या धार्मिक जातीय संकल्पने पुढे, मान्यतेपुढे कोणतंच नातं टिकत नाही. कोणत्याच नात्यांना त्यांच्या पुढे किंमत नाही. उलट जे नातं त्यांच्या जाती आडे येतं त्या नात्यांचा गळा कापला जातो. त्यांचा खून केला जातो. समाजात जातीय दहशद पसरवली जाते. त्यामुळे मला ही जातीयवादी माणसं आतंकवादी वाटतात, जिहादी वाटतात. त्यांना त्यांच्या रक्ताच्या माणसा पेक्षा त्यांची जात महत्वाची आहे. 

केंद्र सरकारचे गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार २०१७ ते २०१९ या तीन वर्षात झारखंडमध्ये ५० ऑनर किलिंगच्या घटना घडल्या आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ९२ घटना या २०१७ मध्ये घडल्या, १९ या २०१८ मध्ये घडल्या आहेत. तर २४ घटना या २०१९ मध्ये घडल्या आहेत. सर्वात जास्त ऑनर किलिंगच्या घटना या झारखंडमध्ये घडल्या. एकूण ५० ऑनर किलिंगच्या घटना या झारखंडमध्ये घडल्या आहेत. त्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्राचा नंबर लागतो. २०१७ ते २०१९ या कार्यकाळात एकूण १९ ऑनर किलिंगच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. आणि १४ ऑनर किलिंगच्या घटना या उत्तर प्रदेश मध्ये घडल्या आहेत. 

( या आकडेवारीसाठी संदर्भ INDIA TODAY ONLINE NEWS ON WEB PORTAL DATED 11/08/2021) वरील आकडेवारीनुसार देशात महाराष्ट्र सुद्धा ऑनर किलिंगच्या बाबतीत अग्रेसर राज्य आहे. आपण महाराष्ट्राला संतांची भूमी, शूरवीरांची भूमी म्हणतो पण या संतांच्या, शूरवीरांच्या भूमीत आपण आपल्या बंधुभगिनींना स्वातंत्र्याने जगू सुद्धा देत नाहीये. त्यांना स्वातंत्र्याने मोकळा स्वास देखील घेऊन देत नाहीये. आपली जातीयवादी मानसिकता ही संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारी आहे. आपण जर बदलायला तयार नसू किंवा आपल्याला सामाजिक सुधारणा/बदल नको असेल तर आपण मग जातीयवादी वर्तन हे सर्वांना सक्तीचे केले पाहिजे. या निष्पाप तरुणांचा आपल्या जातीच्या अस्मितेसाठी जीव घेण्यापेक्षा आपण सगळ्यांना जातीच्या कुंपणातच बांधून ठेवलं पाहिजे. त्यांना फक्त जातीचंच शिक्षण दिलं पाहिजे. जातीचंच राहणीमान अंगीकारायला लावलं पाहिजे. आपण सर्वजण आत्ता ज्या पद्धतीने सर्वजाती धर्माचे मुलंमुली एकत्र शिक्षण घेत आहे ते बंद करून फक्त ज्या त्या जातीच्याच वेगळ्या शाळा महाविद्यालये काढली पाहिजेत. जेणेकरून करून एका जातीच्या मुलामुलींचा दुसऱ्या जातीच्या मुलामुलींसोबत संपर्क होणार नाही. प्रत्येक व्यक्तीला त्याच्याच जातीच्या शाळेत शिकवायचं, त्याने त्याच्याच जातीच्या मुलामुलींना भेटायचं, त्यांच्याच सोबत मैत्री करायची, आपल्याच जातीच्या मुलामुलींच्या प्रेमात पडायचं. प्रेम विवाह केला तरी ती आपल्याच जातीत करायचा. जातीची ओळख व्हावी म्हणून सगळ्यांनी गळ्यात जातीचं आयकार्ड घालावं अशी सक्ती केली पाहिजे. असंच सगळीकडे नोकरीच्या, कामाच्या ठिकाणी केलं पाहिजे सर्वांना सरसकट जातीचं आयकार्ड घालण्याची सक्ती केली पाहिजे. तुमच्याकडे आधारकार्ड नसले तरी चालेल , पॅन कार्ड, मतदान कार्ड नसले तरी चालेल पण तुमच्याकडे तुमच्या जातीचं आयकार्ड असलं पाहिजे. कारण तीच तुमची ओळख आहे तेच तुमचं व्यक्तिमत्त्व आहे, तीच तुम्ही जातीयवादी असल्याची आयडेंटिटी आहे. 

आपण जर बदलायला तयार नाही, आपल्याला जर आपल्या समाज व्यवस्थेत बदल नको आहे तर मग कशाला त्या आंतरजातीय विवाह करणाऱ्या तरुणांचा बळी द्यायचा. सरळ सरळ सरकारने फतवा काढला पाहिजे. आणि तो जातीयवादी फतवा सरसकट राबवला पाहिजे. आपली जातीय मानसिकता नेहमीच आपल्या देशाच्या प्रगतीत बाधा म्हणून मधे मधे येत राहिली आहे. मोदी सरकारच्या काळात हिंदुत्वाचा जो अवाजवी उदोउदो झाला आहे त्यावरून मला वाटत नाही कि आपण अजून सामाजिक सुधारणा करण्याचे लायकीचे आहोत किंवा सामाजिक सुधारणा स्वीकारण्याचे लायकीचे आहोत म्हणून आंतरजातीय विवाह केला म्हणून त्यांची हत्या करणाऱ्या जातीयमानसिकतेने वागणाऱ्या आतंकवादी जिहादी लोकांना आपण कठोर शिक्षा करुन किंवा कठोर कायदा करून आपण ही जात व्यवस्था बदलू नाही शकत किंवा रोखू नाही शकत. माझा कवी मित्र हृदय मानाव अशोक म्हणतो त्या प्रमाणे "आपल्याला जात मानसिकतेचा एन्काऊंटर करावा लागेल" त्यासाठी आपल्याला क्रांतीची मशाल हाती घेऊन ज्ञानाचा दिवा ज्वलंत करावा लागेल. संविधानिक अधिकार लोकांना समजून सांगावे लागतील. लोकांना त्यांच्या अधिकाराविषयी जागृत केलं पाहिजे. त्यांच्या जातीयवादी मानसिकतेमुळे आपण कसे मानव विरोधी कृती करत आहोत याची जाणीव त्यांना करून द्यावी लागणार आहे. लोकांना शिक्षित केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

बदलायचं असेल तर वाहत्या पाण्याबरोबर चला आणि जर नसेल बदलायचं तर तुमच्या जातीचं आयडी कार्ड तुमच्या गळ्यात घाला. त्या निष्पाप तरुणांचा बळी नको. आंतरजातीय विवाह करणाऱ्या तरुणाचं हत्याकांड थांबवायचे असतील तर हाच एकमेव अधोगतीकडे घेऊन जाणारा उपाय दिसून येत आहे.