जुने नाशिक : गणरायाच्या आगमनाने तब्बल दोन वर्षांनंतर बी. डी. भालेकर मैदान भाविकांनी गजबजणार आहे. कोरोना प्रादूर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून भाविकांना बिडी भालेकर मैदानावरील सार्वजनिक मंडळाच्या गणेशोत्सवापासून वंचित राहावे लागले होते. 

अनेक वर्षांपासून बिडी भालेकर मैदानावर अनेक सार्वजनिक मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. मंडळांकडून भव्य आरास केल्या जातात. शहरासह जिल्ह्यातील भाविक याठिकाणी दर्शनासह आरास बघण्यासाठी येतात. त्यानिमित्त बिडी भालेकर मैदानास यात्रेचे स्वरूप येते. दोन वर्ष कोरोना प्रादूर्भावामुळे उत्सव साजरे करण्यावर बंदी होती.

गेल्या वर्षी केवळ दोन मंडळांनी त्याठिकाणी उत्सव साजरा केला होता. तोही साध्या पद्धतीने. यंदा मात्र परिस्थिती सामान्य असून, निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. यामुळे या वर्षी गणेश मंडळ आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पुन्हा एकदा मैदानावर विविध कंपनीचे मंडळ व सार्वजनिक मंडळाकडून गणेशोत्सव साजरा होणार आहे.

बहुतांशी मंडळांनी मंडप व आरासची उभारणी केली आहे. काही मंडळांची तयारी सुरू आहे. सार्वजनिक मंडळ, महापालिका आणि पोलिस प्रशासनानेही आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. बुधवारी (ता. ३१) गणेश स्थापनेने उत्सवाची सुरवात होणार आहे. त्यानंतर पुढील दहा दिवस याठिकाणी मोठा उत्साह दिसून येणार आहे.

दोन वर्ष येथील बाप्पाच्या दर्शनापासून वंचित राहिलेले भाविक दर्शनासह आरास बघण्यासाठी यंदा मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांनी आणि गणेशोत्सवाच्या आरतीने दोन वर्षांनंतर बी. डी. भालेकर मैदान गजबजून जाणार आहे. याठिकाणी छोटेखानी यात्रा भरत असल्याने खेळणी दुकाने थाटण्यास विक्रेत्यांनी सुरवात केली आहे.

भाविकांना पुन्हा एकदा पूर्वीचा गणेशोत्सव अनुभवास मिळणार आहे. निर्बंधमुक्त गणेशोत्सव होणार असल्याने येथील सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. सर्वांना आता प्रतीक्षा आहे ती केवळ गणेशोत्सव प्रारंभ होण्याची.