जुने नाशिक : महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयात गणेशोत्सवाचे १८१ अर्ज मिळाले होते. त्यातील १२१ अर्ज विविध त्रुटींमुळे नाकारले आहेत, तर ४० मंडळांना अधिकृत परवानगी दिली आहे. दरम्यान, सुट्टीच्या दिवशीही रविवारी (ता. २८) विविध कर विभागाचे सहाय्यक अधीक्षक जुबेर सय्यद कार्यालयात हजर राहून मंडळांना परवानगी देत होते.

जुन्यांसह नवीन सार्वजनिक मंडळे या वर्षी गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करणार आहेत. गणेशोत्सव निर्बंधमुक्त असले, तरी महापालिकेची परवानगी आवश्यक आहे. निशुल्क परवानगी मिळत असल्याने अनेक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका विभागीय कार्यालयांमध्ये परवानगीसाठी अर्ज केले आहेत.

पूर्व विभागीय कार्यालयात १८१ अर्ज मिळाले होते. विविध कर विभागाचे सहाय्यक अधीक्षक जुबेर सय्यद आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सर्व अर्जांची योग्य छाननी केली. छाननीत काही मंडळांकडून एकदा, दोनदा, तीनदा नव्हे, तर तब्बल वीस वेळेस अर्ज केल्याचे आढळले. काहींचे हमीपत्र नाही, काहींकडे आधार कार्ड नाही, जागेचा नकाशा नाही, अशा त्रुटींमुळे त्यातील सुमारे १२१ अर्ज रद्द करण्यात आले.

सर्व गोष्टींची पूर्तता करून ६० अर्जांची स्वीकृती करण्यात आली. त्यातील ४० मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. २० मंडळांना परवानगी देण्याचे काम प्रगतिपथावर सुरू असल्याचे सांगण्यात आले. अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक अर्ज प्राप्त झाल्याचेही सांगण्यात आले.

सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू

गणेशोत्सवास अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. मंडळांना परवानगीची अडचण भासू नये, यासाठी परवानगी देण्यासाठी असलेले विविध कर कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरू होती व मंडळांना परवानगी दिली जात होती.