सवाद्य, जयघोष आणि पुष्पवर्षाव करून त्यांचे जैन श्रावकांनी केले स्वागत
सोलापूर : - माणिकस्वामी मंदिरातील सर्व दिशांना असलेल्या स्तंभांवर दहा दिशासंबधी असणाऱ्या बीजाक्षरांचा उल्लेख आहे, असे मी पहिलेच मंदिर पाहिले किंवा देशातले हे पहिलेच मंदिर असावे. या प्राचीन मंदिराचा जन्म अत्यंत सुंदर आणि भव्य झाला आहे,असे कर्नाटकातील सौंदा मठ येथील परमपूज्य भट्टारकश्री अकलंक स्वामीजी म्हणाले
भुसार पेठेतील श्री. दिगंबर जैन माणिकस्वामी महाराज मंदिरात रविवारी २८ व सोमवारी २९ ऑगस्ट रोजी जीर्णोध्दारित जिनमंदिर शुद्धी समारोह व श्री कालिकुंड पार्श्वनाथ विधानाचे आयोजन त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. शनिवारी त्यांचे मंदिरात आगमन झाले. त्यावेळी श्रावकांना उद्बोधन करताना ते बोलत होते. "कर्माप्रमाणे पुण्य मिळते, मंदिरात योगदान दिल्याने कर्म वाढते. जो, ज्या प्रकारे, जिथे, जसे कर्म करतो तो त्या प्रकारे तिथे, तसेच फळ प्राप्त करतो," हेही उदाहरणासह त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक डॉ. महावीर शास्त्री यांनी केले. पंडित विजयकुमार काळेगोरे यांनी भाव प्रतिक्रमण म्हंटले.
तत्पूर्वी विजापूर रोडवरील बाहुबली मंदिर येथे त्यांचे सोलापूर नगरीत आगमन झाले. सवाद्य, जयघोष आणि पुष्पवर्षाव करून त्यांचे जैन श्रावकांनी स्वागत केले. यावेळी डॉ. रणजीत गांधी व सौ माया गांधी यांनी पाद प्रक्षालन पूजा केली. यावेळी बाहुबली मंदिरचे विश्वस्त सुधीर पंडित, अनिल माणिशेटे, कैलास बोंदार्डे यांच्यासह पृथ्वीराज गांधी, सुनील गांधी, अरविंद शहा, भूषण शहा, पराग शहा, प्राचार्य डॉ. सत्यजित शहा, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, डॉ. आश्विन बोंदार्डे, अरुण धुमाळ तसेच जैन समाजातील श्रावक व श्रविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.