औरंगाबाद :- शैलेंद्र खैरमोडे
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
मागील दोन वर्षात कोविड 19 मुळे गणेशोत्सव व इतर सण साजरे करता आले नाहीत. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा गणेशोत्सव उत्साहात, निर्बंधमुक्त आणि शांततेत साजरा करण्याचे आवाहन केलेले आहे. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव शांततेत, उत्साहात साजरा करावा, असे आवाहन सहकार मंत्री अतुल सावे यांनी केले.
पोलिस आयुक्त कार्यालयाच्यावतीने संत एकनाथ रंग मंदिर येथे समन्वय बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी श्री. सावे बोलत होते. या बैठकीस केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, चंद्रकांत खैरे, नंदकुमार घोडेले, किशनचंद तनवाणी, गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष विजय औताडे, सिडको हडको गणेश महासंघाचे सागर शेलार, नवीन औरंगाबाद गणेश महासंघाचे नितीन कुलकर्णी, छावणी गणेश महासंघाचे अशोक आमले, पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, मनपाचे आयुक्त तथा प्रशासक अभिजित चौधरी आदींची उपस्थिती होती.
मंत्री सावे यांनी गणेश मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले. वर्षानुवर्षापासून सुरू असलेल्या गणेश उत्सवातील परंपरा कायम राहाव्यात, यासाठी पोलिस प्रशासनाने मंडळांना सहकार्य करावे. आवश्यक त्या परवानग्यांसाठी नियमांमध्ये शिथिलता आणत सर्व मंडळांनी मागणी केलेल्या परवानग्या द्याव्यात, अशा सूचनाही पोलिस विभागाला केल्या. शहरात मोठ्याप्रमाणात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्ते विकासाची कामे होत असल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.
केंद्रीय राज्य मंत्री डॉ.कराड यांनी पोलिस, मनपा प्रशासन त्यांच्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडतील. परंतु गणेश मंडळांनी, गणेश भक्तांनीही सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन केले. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. गणेश मूर्तीचे व उत्सवाचे पावित्र्य राखले जाईल, यासाठी गणेश मंडळांनी स्वयंशिस्त पाळावी, असेही डॉ. कराड म्हणाले. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा विमा उतरविण्यात येईल, तर प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत गरजूंना बँकेत खाते उघडून देण्यासाठी बँकांमार्फत शिबिरांचे आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार जैस्वाल, आमदार शिरसाट, श्री. खैरे, श्री. घोडेले, श्री. औताडे, श्री. कुलकर्णी, श्री. शेलार आदींसह शहरातील गणेश मंडळांच्या अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक यांनीदेखील यावेळी उत्सव कालावधीत करावयाच्या कामांबाबत प्रशासनासमोर सूचना मांडल्या.
निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आग्रह गणेश मंडळांचा असावा, अशी अपेक्षा श्री. चौधरी यांनी व्यक्त केली. या बैठकीत मांडलेल्या सूचनांचे वेळेत निराकरण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गणेशोत्सव सुरक्षित, आनंदी वातावरणात व्हावा, यासाठी पोलिस प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य गणेश मंडळांना करण्यात येईल. मंडळांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री. गुप्ता यांनी केले. लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या सूचनांचे स्वागतच असल्याचेही ते म्हणाले. बैठकीनंतर महासंघांच्या चारही अध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.