अभिवादन रॅलीतील संस्कृतीक जत्था जय भीम च्या नाऱ्याने बीड शहर दणाणले
बीड(प्रतिनिधी):- महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महोत्सव समितीच्या वतीने आज सकाळी अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या अभिवादन रॅलीत वामनदादांचा अस्थीकलश प्रत्यक्ष अभिवादनासाठी ठेवण्यात आला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे बीड समाज कल्याण उपायुक्त रवींद्र शिंदे यांनी पंचशील ध्वजाचा झेंडा दाखवून अभिवादन रॅलीस सुरुवात केली.यावेळी संस्कृतीक जथ्यातील भीमगीत आणि जय भीमच्या नाऱ्याने बीड शहर दणाणले होते.
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी निमित्त महोत्सव समितीच्या वतीने दि.२६ ऑगस्ट रोजी बीड शहरामध्ये काव्य अभिवादन आणि २७ ऑगस्ट रोजी अभिवादन रॅलीच्या माध्यमातून वामनदादा कर्डक यांना अभिवादन करण्यात आले.आंबेडकर चळवळीचा बुलंद आवाज असणारे महाकवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या गीताच्या माध्यमातून सामाजिक क्रांतीचा विचार दिला, समाजाचे प्रबोधन घडविले. वामनदादा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महोत्सव समितीच्या वतीने अभिवादन करण्यासाठी त्यांचा अस्थिकलश बीड शहरात आणण्यात आला होता.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन अभिवादन रॅली काढण्यात आली.या अभिवादन रॅलीत प्रा.प्रदिप रोडे,संदीप उपरे,प्रा.राम गायकवाड,नगरसेवक भैय्यासाहेब मोरे, प्राचार्य प्रदीप गाडे, प्रशांत वासनिक, प्राचार्य पांडुरंग सुतार, डॉ.नामदेव शिनगारे, अमरसिंह ढाका, प्रा.भारत मगर, महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा.शरद वंजारे,प्रा.डॉ.संजय कांबळे,प्रा. दिपक जमधाडे, कॅप्टन राजाभाऊ आठवले, यांच्यासह सर्व प्रतिष्ठित नागरिक, अधिकारी,कर्मचारी,प्राध्यापक,विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.