स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण सर्व भेद बाजूला ठेवून एकत्र येऊन महाराष्ट्राला सर्वच आघाड्यांवर प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प करुया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विधानसभेत अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री बोलत होते. स्वातंत्र्यसेनानी व स्वातंत्र्योत्तर काळातील नेते आणि शास्त्रज्ञ यांच्याप्रती कृतज्ञता आणि अभिवादन मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी प्रस्तावाच्या माध्यमातून केले.यावेळी विधानसभेतील विरोधीपक्षनेते अजित पवार, सदस्य बाळासाहेब थोरात , जयंत पाटील, छगन भुजबळ, विश्वजीत कदम यांच्यासह सदस्यांनी प्रस्तावास अनुमोदन दिले.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्रमोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत भारतीय संस्कृतीच्या वैभवशाली इतिहासाचा उत्सव साजरा केला जात आहे. हा उत्सव देशाच्या आजपर्यंतच्या प्रवासात मौलिक योगदान देणाऱ्या भारतीयांना समर्पित केलेला आहे. स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक, स्वातंत्र्योत्तर काळातील नेते, शास्त्रज्ञ आणि विविध क्षेत्रात प्रगती साधणाऱ्या ज्ञात-अज्ञात मान्यवरांना अभिवादन करत मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य ही स्वातंत्र्याची मुहुर्तमेढ ठरली आहे.भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात, महाराष्ट्राचे योगदान अतुलनीय असून, महाराष्ट्र या अभियानात उत्साहाने सहभागी झाला.भारत देश जगातले सगळ्यात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला समानता, एकता आणि बंधुता या मुल्यांची जपणूक करणारी जगातील सर्वात मोठी लिखित स्वरुपातील घटना दिली आहे. लोकमान्य टिळकांनी संपूर्ण स्वराज्यासाठी केलेली जनजागृती, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने केलेल्या अनेक चळवळी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील योगदान, राजगुरु, सुखदेव आणि भगतसिंग यांसारख्या अनेक क्रांतीकारकांच्या बलिदानातून भारताचे स्वातंत्र्य उदयास आले आहे. जगात शांतता नांदावी आणि सर्व देशांना विकासाची संधी उपलब्ध व्हावी असे भारताचे धोरण राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचा आणि विचारांचा, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले अशा समाज सुधारकांच्या ध्येयाचा आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रसंगी ब्रिटीशांच्या गोळ्या अंगावर झेलणाऱ्या राष्ट्रभक्तांचा वारसा महाराष्ट्राला लाभला असल्याचे गौरोवोद्गार देशाच्या आजवरच्या प्रगतीशील वाटचालीत महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. देशाच्या विकासात प्रगत राज्य म्हणून ओळख असलेला महाराष्ट्र भविष्यातही अग्रेसर राहील असा निर्धार करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी केले.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्याने दर्जेदार आरोग्य सुविधा, सामाजिक न्याय, सामाजिक सलोखा, कौशल्य विकास, युवा शक्ती, अर्थ साक्षरता, माहिती तंत्रज्ञान, सुशासन, रोजगार निर्मिती, चिरंतन विकास, महिलांचा वाढता सहभाग, माझी वसुंधरा, पर्यटनास अधिक संधी, सांस्कृतिक निर्देशांक वाढ, या क्षेत्राला प्राधान्य दिले आहे, आणि या क्षेत्रांमध्ये आणखी प्रगती साधण्याचा प्रयत्न शासन करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.