रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामे युद्ध पातळीवर सुरु आहेत. २०२४ पर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठ्याचे नियोजन रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. असेअसलेतरी जिल्ह्यातील नागरिकांनी जलजीवन योजनेमधील गैरप्रकाराबाबत तक्रार केल्यास रायगडातील जलजीवन मिशनच्या योजनांच्या गुणवत्तेची चौकशी करण्यासाठी पथक नेमून ऑडिट करण्यात येईल. असे स्पष्ट संकेत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग तथा जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी दिले.  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या योजना तळागाळात पोहचत आहेत कि नाही याची खात्री आणि मोदी सरकार बाबत जनतेमध्ये असणारे मत याची चाचपणी करण्यासाठी प्रवास योजना सुरु करण्यात आली आहे. या प्रवास योजनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग तथा जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचा दौरा केला. जनतेच्या समस्या जाणण्यासाठी केंद्रीय मंत्री रायगड जिल्ह्यात येणे हि पहिलीच वेळ असल्याने जनतेने देखील आपल्या समस्या मंत्र्यांच्या समक्ष कथन केल्या.दौऱ्यानंतर रायगड जिल्हा नियोजन भवन येथे जलजीवन मिशनचा आढावा घेण्यात आला. 

    या आढावा बैठकीनंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर , आमदार रवींद्र पाटील , माजी आमदार विनय नातू , भाजप जिल्हा चिटणीस मिलिंद पाटील , राजेश मपारा , हेमंत दांडेकर , अविनाश कोळी , अंकित बंगेरा , समीर राणे , सोपान जांभेकर , अमित घाग , अशोक वारगे , सतीश लेले , निलेश महाडिक , राजेश पाटील, परशुराम म्हात्रे , सुनील दामले आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

   रायगड जिल्ह्यात जलजीवनच्या कामासाठी वातावरण निर्मिती झाली आहे. २०२४ पर्यंत जिल्ह्यात जलजीवनचे काम पूर्णत्वास नेण्याचा रायगड जिल्हा परिषदेचा निर्धार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले आहे. असे असलेतरी जलजीवनच्या कामासाठी रायगड जिल्ह्यात कंत्राटदार मिळणे कठीण झाले आहे. यामुळे आतापर्यंत ७१ टक्के काम पूर्ण झाले आहे. काम पूर्ण झालेतरी नागरिकांना स्वच्छ पाणी देण्याची अग्निपरीक्षा प्रशासनासमोर असणार आहे. यामुळे केंद्र सरकारने स्वच्छ पाणी नागरिकांना देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ५ महिलांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. नळपाणी योजनेच्या डागडुजीसाठी गावातील तरुणांना प्लम्बिंगचे प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न आहे असे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग तथा जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी सांगितले. 

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असणाऱ्या वाळंज खोऱ्यामधून कोकण रेल्वेला जाण्यासाठी नदीवर पूल उभारण्यात आला आहे. पावसाळ्यातील पुरामुळे या पुलाला गाळाने घेरले आहे. याठिकाणी पुलाला पिलर बांधण्यात यावे अशी मागणी स्थानिकांकडून आली आहे. याबाबत रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे मंत्री यांच्याकडे संपर्क साधला आहे. हा पूल उभारण्यासाठी पत्रव्यवहार करणार असल्याचे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग तथा जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी सांगितले. 

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात सीआरझेडची अडचण योजना राबविण्यासाठी येत असल्याचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितली आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी संबंधित मंत्रालय आणि मंत्री यांच्याबरोबर चर्चा करणार आहे. विकासाच्या दृष्टीने सीआरझेडचा मुद्दा अडचणींचा असल्याने यावर लवकरच निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे असे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग तथा जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी सांगितले.