नांदेड (आप्पासाहेब गोरे )बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण यांनी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचा पदभार घेऊन २२ आँगस्ट रोजी वर्षपुर्ती झाली आहे. या वर्षभराच्या काळात हुनगुंदा येथे राजस्थान राज्यातुन हरभरा काढणी यंत्र घेऊन आलेल्या पिता व पुत्रांच्या दुहेरी हत्याकांडाचा २४ तासात छडा लावण्याबरोबरच अवैध दारूविक्री,जुगार, गांजाविक्री व गुटखा विक्रीवर कारवाई करण्याबरोबरच सामाजिक उपक्रम व कार्यावर सहायक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण यांचा भर राहिल्याचे त्यांच्या वर्षभराच्या कामगिरीवरून स्पष्ट होते.
कुंडलवाडी पोलीस ठाणे महाराष्ट्र व तेलगंणा राज्याच्या सीमेवर वसलेले गाव आहे.ठाण्याअंतर्गत परिसरातील २६ गावे येतात.सपोनि सुरेश मांटे यांच्या बदलीनंतर २२ आँगस्ट २०२१ रोजी सपोनि करीमखान पठाण यांनी कुंडलवाडी पोलीस ठाण्याची सुत्रे स्वीकारली.सुत्रे स्वीकारल्यानंतर ठाण्याअंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच सामाजिक कार्य करण्यावरही गत वर्षभरात त्यांचा भर राहिला आहे. पदभार घेताच शहर व परिसरात अनेक शेतकऱ्यांचे जनावरे चोरींच्याघटना घडल्या होत्या. या प्रकरणाचा बारकाईने तपास करून जनावरे चोरीतील ५ गुन्हे उघडकीस आणुन ३ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोटारसायकल चोरीच्या दोन गुन्ह्यात ३ मोटारसायकली जप्त करून आरोपीस जेरबंद करण्यात आले. अवैध दारूविक्रीचे ५३ गुन्हे दाखल करून ९८ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगारप्रकरणी १७ गुन्हे दाखल करून ६३ हजार ६१० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गांजा विक्रीचे दोन गुन्हे दाखल करून ८ लाख ३९ हजार ९०३ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुटखा विक्रीच्या एका गुन्ह्यात ५ हजार २५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हुनगुंदा येथे मार्च महिन्यात राजस्थान राज्यातील पिता व पुत्र हरभरा काढणी यंत्र घेऊन आले होते.या पिता व पुत्राचा खून झाला होता. या प्रकरणाचा सपोनि करीमखान पठाण यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या २४ तासात दुहेरी हत्याकांडाचा छडा लावत आरोपींना जेरबंद केले.यासह ठाण्याच्या परिसरात महिला विश्रामकक्षाचे काम त्यांच्या कार्यकाळात पुर्ण झाले आहे. यासह सपोनि करीमखान पठाण यांचा खाकी वर्दीतली माणुसकी त्यांच्या सामाजिक कार्यातुन गत वर्षभरापासून दिसली. ठाणे परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम व वृक्ष संगोपन ही त्यांनी गतवर्षभरात केले दोन वेळेस बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या मार्गदर्शनाने शहरात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत सहभागही नोंदवत तरुणांमध्ये देशभक्तीची भावना रूजवली. याचबरोबर 15 ऑगस्ट 2022 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करून 96 रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले व ऐतिहासिक रक्तदान शिबिराची पोलीस ठाण्याच्या इतिहासात नोंद झाली आहे.रक्तदान शिबिराचे उदघाटन दहावी परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेल्या कु.लक्ष्मी खांडरे व कु.सिद्धिका खुळगे यांच्या मार्फत केले व दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करून एक नवीन पायंडा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये पाडला आहे. गत २०२१ वर्षातील गणेशोत्सवाच्या काळातही सामाजिक उपक्रम राबवून गणेश मंडळांना पारितोषिके देऊन प्रोत्साहन देण्याचे काम सहायक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण यांनी केले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण यांच्या कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या पदभार घेण्याच्या वर्षपूर्ती निमित्त आज २२ ऑगस्ट रोजी ठाण्यातर्फे करीमखान पठाण यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी,वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद माहुरे,ज्येष्ठ पत्रकार गणेश कत्रुवार,पत्रकार कुणाल पवारे,संतोष शिवशेट्टे,पोहेकाँ तैनात बेग,पोहेकाँ शंकर चव्हाण,पोलीस अमंलदार नजीर शेख,गणेश गंधकवाड,दिलीप जाधव,संजय चापलवार,रघुवीरसिंह चौहाण,इद्रिस बेग,म.अलीमोद्दीन म.खयामोद्दीन,संजय चापलवार आदीजण यावेळी उपस्थित होते.