नांदुरा: दि.२३. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या आदेशानुसार मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक नांदुरा येथे जनतेची महागाईवर चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक २०१४ च्या प्रचारावेळी वारेमात आश्वासन दिली होती. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, प्रत्येकाच्या खात्यामध्ये १५ लाख रुपये जमा करणार, यासारखे आश्वासने देऊन मोदींनी सत्ता मिळवली परंतु मागील आठ वर्षात यातील एकही आश्वासन ते पूर्ण करू शकले नाही. भाजपा केंद्रात सत्तेवर येऊन आठ वर्षे झाली पण महागाई व बेरोजगारी कमी झाली नाही उलट यात प्रचंड वाढ झाली असे प्रतिपादन राजेश एकडे यांनी यावेळी केले.

केंद्रातील भाजपा सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. मोदी सरकारच्या काळात महागाई व बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. मागील 14 महिन्यात महागाईचा दर दोन अंकी झाला आहे.पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी, खाद्यतेल, डाळ, किराणा माल यांचे भाव सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. महागाईने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले असताना मोदी सरकारने दूध, दही, पनीर, पीठ ,मीठ, तांदूळ यासारख्या दररोज लागणाऱ्या वस्तूंवर जी.एस.टी. लावून महागाईत आणखी भर घातली आहे. मुलांचा शालेय वस्तू हॉस्पिटल मधील बेडवर जी.एस.टी. असा या सरकारचा महागाईचा पाडा यावेळी आमदार राजेश एकडे यांनी वाचला. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.