वैजापूर :-
तालुक्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोघांनी आपला जीव गमावला. नागपूर मुंबई महामार्गावर करंजगावजवळ वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रक व कार यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील एकाचा मृत्यु झाला. या घटनेतील मृताची आधारकार्ड द्वारे ओळख पटली असुन त्याचे नाव अनवय मकरंद पाठक (वय ३३) असल्याची माहिती समोर आली आहे. मयत देवपूर जिल्हा धुळे येथील रहिवासी आहे. अनवय पाठक हे अल्टो कारमधुन (क्रमांक एमएच २१ ई २८३०) आईला भेटण्यासाठी नाशिक येथुन औरंगाबादला जात होते. नागपूर मुंबई महामार्गावर करंजगावजवळ दुपारी साडेबाराच्या सुमारास कारला वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकने (एमएच २३एयु २२७९) जोराची धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी भयंकर होती कि अपघातानंतर कारचा पुर्ण चेंदामेंदा झाला.स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करतअनवय पाठक यांना तातडीने वैजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासुन मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक ज्ञानेश्वर विलासराव रणहेर यास ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या अपघातात दुचाकीला मालवाहु रिक्षाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. अण्णासाहेब अशोक काळे (वय ४० या. चांदेगाव, वैजापूर) असे मृताचे नाव आहे. अण्णासाहेब हे दुचाकीवर (क्रमांक एमएच २० बीएफ ६६१२) वैजापुरहुन चांदेगाव येथे घराकडे जात होते. त्यावेळी गंगापूर रस्त्यावर वीरगाव फाट्याजवळ गंगापुरहुन वैजापुरकडे येणाऱ्या मालवाहु रिक्षाने (क्रमांक एमएच २० ईएल ९१६२) त्यांना जोराची धडक दिली. त्यामुळे अण्णासाहेब काळे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले. या अपघाताची वैजापूर व वीरगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असुन पुढील तपास वैजापूर व विरगांव पोलिस करत आहे.