केंदूर ता. शिरुर येथील पुणे ते केंदूर ही गेली अनेक वर्षापासून सूरु असलेली पीएमपीएल बस बंद करण्यात आलेली असून सदर बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची सूचना पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी पीएमपीएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना एका पत्राद्वारे केली आहे.
केंदूर ता. शिरुर सह शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागात सुरु पीएमपीएल बसच्या अनेक सेवा बंद करण्याचा निर्णय पीएमपीएल विभागाने घेतला असून यामध्ये मनपा ते केंदूर व भोसरी आगार ते आळंदी, बहुळ, केंदूर, पाबळ ही बस सेवा बंद करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जाहीर होताच केंदूर सह करंदी ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता तसेच बस सेवा सुरु रहावी यासाठी वाजेवाडीचे माजी उपसरपंच अमित सोनवणे यांनी खासदार गिरीश बापट यांच्याकडे मागणी केली होती. सदर बस अनेक वर्षांपासून सुरु असल्याने अनेक नागरिक व ग्रामस्थ नोकरी आणि व्यवसायासाठी दैनंदिन प्रवास करत आहे. तसेच या परिसरातील गावातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात वाघोली व पुणे शहराच्या परिसरात शैक्षणिक कारणासाठी जात असतात. नागरिक प्रवासी व विद्यार्थ्यांची समस्या समजावून घेऊन या मार्गावरील बस सेवा सुरू करावी अशी मागणी अमित सोनवणे यांनी खासदार गिरीष बापट यांच्याकडे केली होती त्यानुसार सदर बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची सूचना पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी पीएमपीएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना केली आहे.