अमरावती जिल्ह्यात 7 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याबाबत कार्यक्रम जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केला.माहे जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून - 2022 ते सप्टेंबर -2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार अमरावती तालुक्यातील रोहणखेडा येथील 7 सदस्य पदांची तसेच थेट सरपंच पदाची निवडणूक होईल. थेट सरपंच पद महिला गटासाठी आरक्षित आहे.
तिवसा तालुक्यातील घोटा, कवाडगव्हाण, आखतवाडा, उंबरखेड येथील प्रत्येकी 7 सदस्यांसाठी तसेच सरपंच पदासाठी निवडणूक होईल. घोटा व कवाडगव्हाण येथील सरपंच पद सर्वसाधारण महिला गटासाठी तर आखतवाडा येथील सरपंच पद ना.मा.प्र. महिला गटासाठी आणि उंबरखेड येथील सरपंच पद सर्वसाधारण गटासाठी आहे. चांदुररेल्वे तालुक्यात चांदूरवाडी येथील 7 सदस्य व थेट सरपंच पदासाठी निवडणूक होईल. धारणी तालुक्यातील हरिसाल येथील 11 सदस्य पदासाठी व सरपंच पदासाठी थेट निवडणूक होईल. चांदूरवाडी येथील सरपंच पद ना.मा.प्र. महिला गटासाठी व हरिसाल येथील सरपंच पद अनुसूचित जमाती पदासाठी राखीव आहे.