पत्रकारिता हा समाजाचा आरसा- जिल्हाधिकारी पापळकर 

पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा 

हिंगोली- पत्रकारिता हा समाजाचा आरसा असून प्रशासकीय कामकाजामध्ये पत्रकारांमुळे अनेक बाबी आमच्यासमोर येतात. ज्यामुळे योग्य प्रशासन निर्माण करण्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित जेष्ठ पत्रकारांच्या विशेष सन्मान सोहळ्यानिमित्त केले.

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त पत्रकारितेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर व स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यानिमित्त ज्येष्ठ पत्रकार तुकाराम झाडे, विजयकुमार निलावार, सुभाष अपूर्वा व एकनाथ पाचमासे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांचा देखील जिल्हाधिकारी पापळकर व निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 यावेळी जेष्ठ पत्रकार तुकाराम झाडे व विजयकुमार निलावार यांनी पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात असलेली परिस्थिती विषद करताना पत्रकारांना येणाऱ्या अडचणींचे अनेक किस्से सांगितले. अध्यक्षीय समारोपात पापळकर यांनी जेष्ठ पत्रकारांनी केलेल्या कार्याचे कौतुक करताना प्रशासकीय कामकाजामध्ये अनेक गोष्टींकडे आम्हाला लक्ष देता येत नाही, परंतु पत्रकार हा समाजाचा आरसा असतो आणि त्यांच्या माध्यमातून अनेक बाबी आमच्या नजरेस येतात ही आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब असल्याने पत्रकारितेचे महत्व अधोरेखित होते. असे कौतुक देखील त्यांनी केले.

 या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न गिरीकर, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे यांच्यासह मकरंद बांगर, बालाजी पाठक, सहाय्यक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, सुधीर गोगटे, गजानन लोंढे, संदीप नागरे, माधव दिपके, मनीष खरात, ज्ञानेश्वर उंडाळ, हाफिज बागवान, महेंद्र पुरी, बालाजी गिरी, नंदकिशोर कांबळे, पल्लवी अटल, विलास जोशी, राजेश दरवेकर, बाबुराव ढोकणे, गजानन मगर,  सुनील पाठक, विजय गुंडेकर, चंद्रकांत वैद्य, निलेश गरवारे, कैलास लांडगे आदींची उपस्थिती होती.