संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अभूतपूर्व लढ्यातून बनलेले महाराष्ट्र हे संविधानिक राज्य आहे. आत्ताच्या महाराष्ट्र सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा असंविधानिक निर्णय घेतला. त्यासाठी प्राथमिक शाळातील अभ्यासक्रम व वेळापत्रकात बदल करण्याचेही ठरवले. जनतेचा दबाव आल्यानंतर जीआर मागे घेतले पण नव्या जीआर मध्ये नरेंद्र जाधव समिती नेमण्याचे घोषित केले. ही लबाडीच आहे म्हणून मुंबईतील शालेय अभ्यास व कृती समितीने सात जुलै रोजी मुंबईत धरणे आंदोलन ठेवले. विद्रोही सांस्कृतिक चळवळीने या आंदोलनात सहभाग घेतला. जोपर्यंत नरेंद्र जाधव समिती तसेच प्राथमिक शाळांमध्ये हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय पूर्णतः रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील. मुख्यमंत्र्यांनी तर विधिमंडळ अधिवेशनाच्या समारोप वेळी त्रिभाषा सक्तीची होणारच असे विधान केले आहे. दुसरीकडे मराठी शाळा मरणपंथाला लागलेल्या आहेतच या पार्श्वभूमीवर मराठी भाषा व संस्कृती जिवंत ठेवणारी जनजागृती करण्यासाठी आणि मराठी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी एक प्रबोधन मोहीम महाराष्ट्रभर चालू झाली असल्याचे आज विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले यांनी प्रतिपादन केले. हिंदी सक्ती संदर्भात चर्चा करून कृती कार्यक्रम ठरवण्यासाठी संभाजीनगर (औरंगाबाद) येथे रविवार दि 20 जुलै 2025 रोजी आयोजित बैठकीत ते बोलत होते. सत्यशोधक समाजप्रमुख मा. के. इ. हरिदास बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. आजच्या बैठकीचे प्रास्ताविक प्रा. भारत शिरसाठ यांनी केले तर सूत्रसंचालन एड वैशाली डोळस यांनी केले. आजच्या बैठकीत संभाजीनगर येथे रविवार दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार लोकशाहीर कॉ अण्णाभाऊ साठे आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने *मराठी भाषा व संस्कृती बचाव परिषद* आयोजित करण्याचे करण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेत उद्घाटन व समारोप सत्रांव्यतिरिक्त दोन परिसंवाद व एक कवी संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.
दिनांक 3 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या मराठी भाषा व संस्कृती बचाव परिषदेचे स्वागताध्यक्षपदी शिक्षणतज्ञ मा. एम. के. देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. तर 19 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे पदाधिकारी इंजि.सतीश चकोर, एड.के इ हरिदास व सुभाष मेहर यांची निमंत्रक म्हणून तर एड. वैशाली डोळस व धनंजय बोर्डे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असल्याचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते प्रा.भारत शिरसाठ व संविधान विश्लेषक अनंत भवरे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
सिडकोस्थित सत्यशोधक कार्यालयात आज झालेल्या बैठकीत भाषा धोरण,शिक्षण धोरण, मराठी शाळा,शिक्षक स्थिती इ. प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी प्रख्यात कवी प्रा.समाधान इंगळे, भाऊसाहेब जाधव, सविता अभ्यंकर, अरविंद खैरनार,प्रा. विनय हातोले, एस एम थोरे,रामदास अभ्यंकर, वजीर शेख, धर्मेंद्र समुद्रे,भाऊ पठाडे, धम्मरक्षित सामुद्रे, सुधाकर निसर्ग, शैलेंद्र मिसाळ इ.मान्यवर उपस्थित होते. डॉ. धोंडोपंत मानवतकर यांनी आभार प्रदर्शन केले.