शिवसंग्रामचे कार्यकर्ते यांनी विनायक मेटेंच्या गाडीचा दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग झाल्याचा दावा केला होता. 3 ऑगस्ट रोजी विनायक मेटे त्यांच्या एका कार्यकर्त्यासमवेत पुण्याच्या दिशेने येत असताना हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची आता सीआयडी चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत आदेश दिले आहेत.
मेटेंचा अपघात की घातपात अशी शंका उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.
त्यातच काही दिवसांपूर्वी मेटे यांच्या गाडीचा पाठलाग करणारी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते यांनी विनायक मेटेंच्या निधनाआधी त्यांच्या गाडीचा दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग झाल्याचा दावा केला होता. ३ ऑगस्ट रोजी विनायक मेटे त्यांच्या एका कार्यकर्त्यासमवेत पुण्याच्या दिशेने येत असताना हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
यासंदर्भातील स्थानिक पत्रकाराशी संवाद साधतानाची कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी आता चौकशी सुरू केली आहे.
रांजणगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवंत मांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव पोलिसांनी ती गाडी ताब्यात घेतली आहे.दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचे मालक कम चालक संदीप विर याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची चौकशी करण्यात आली आहे.
३ तारखेला या गाडीच्या चालकासह त्यांच्या सोबत ६ जण होते. ६ जणांपैकी एकाचा वाढदिवस असल्याकारणाने ते शिरूरला गेले होते. तसेच त्यांचे नातेवाईक देखील शिरूर मध्ये असून ते त्या कारणाने तिथं गेले होते, असं चौकशीमधून समोर आलं आहे. या प्रकरणी पुढील चौकशी पोलिस करत आहेत.