मुंबई दिनांक १६ आरोग्य सुविधा वेळेत न मिळाल्याने मोखाडा (जि. पालघर) तालुक्यातील एका गर्भवती महिलेच्या जुळ्या बालकांचा झालेला मृत्यु हा दुर्दैवी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत विकासरूपी पोषण अजूनही दुर्गम भागात नाही याचं दुःख आहे असं ट्विट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटची आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी तातडीने दखल घेतली आहे. 

जव्हार - मोखाडा सारख्या दुर्गम भागातील आदिवासी महिलेच्या बाबतीत घडलेला हा प्रकार दुर्दैवी आहे, या घटनेने मी व्यथित झाले आहे असे पंकजाताई म्हणाल्या. "एका माऊलीला जुळ्या मुलांना जीव गमवावा लागला. कारण गावाला रस्ता नाही.गरिबांच्या गरजा आणि जीवाची लढाई आजही कठीण आहे.अमृत महोत्सवी वर्षात देशाच्या या भागात विकास रूपी पोषण अजुनही नाही याचं दुःख व दुर्दैवी वाटले " असं ट्विट त्यांनी केलं आहे.

मी स्वतः याबाबत राज्य सरकारला पत्र लिहिणार आहे. मी मंत्री असताना दुर्गम भागातील रस्त्याकडे विशेष लक्ष दिले होते. मंत्री आणि अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधून काम केलं पाहिजे. सरकारने दुर्गम भागाच्या विकासाकडे लक्ष द्यावे आणि राज्य सरकार ते करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान पंकजाताई यांच्या ट्विटची आदिवासी विकास मंत्री गावित यांनी तातडीने दखल घेत सरकारी पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत.