‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमीत्त महाराजस्व अभियान अंतर्गत जुन्नर तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १ हजार ४९ लाभार्थ्यांना विविध योजनांच्या आदेशांचे वाटप करण्यात आले.

जुन्नर पंचायत समितीत महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते या आदेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर, तहसीलदार रवींद्र सबनीस, सहायक गट विकास अधिकारी हेमंत गरिबे, निवासी नायब तहसीलदार सचिन मुंडे उपस्थित होते.

लाभार्थ्यांना गतीने लाभाचे वाटप आदेश देण्यात आल्यामुळे महाराजस्व अभियान तालुक्यात यशस्वी होण्यास मदत झाली आहे. दरम्यान गावोगावी घेण्यात आलेल्या शिबिरांमुळे हे शक्य झाले असून अशी शिबिरे नियमित भरवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

महाराजस्व अभियानांतर्गत तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार, सहायक गट विकास अधिकारी तसेच निवासी नायब तहसीलदार यांनी विशेष परिश्रम घेतले. तालुक्यातील कातकरी व ठाकर समाजाला जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. वर्षानुवर्षे दाखल्यासाठी या समाजातील कुटुंबांचे प्रयत्न सुरू होते. या उपक्रमातून दाखले मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

कातकरी समाजाला जातीचे दाखले- ३९, दुबार रेशन कार्ड- ६२, विविध घरकुल योजनांचे मंजुरी आदेश वाटप अंतर्गत यशवंत घरकुल योजना- १४५, दिव्यांग घरकुल- ९७, प्रधानमंत्री घरकुल योजना- ५१४, रमाई घरकुल योजना- ६३, शबरी घरकुल योजना- १२५ मंजूर आदेश आणि पूर्ण झालेले घरकुल मिळकत उतारे ४ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.