शिरुर दिनांक ( वार्ताहर )कारेगाव व रांजणगाव येथे पोलीसांनी छापा टाकुन दोन गांजा विक्रेते व दोन गांजा ओढणारे इसमांविरुध्द कारवाई केली आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरित्या गांजाची चोरुन विक्री होत असल्याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार गोपनिय माहिती घेतली असता विजया शितोळे कारेगावचे हद्दीतील एका वस्तीमध्ये गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वाघमोडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक सविता काळे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार विजय सरजिने,पोलीस हवालदार विद्या बनकर, चालक पोलीस हवालदार माऊली शिंदे व पो.कॉ. उमेश कुतवळ यांनी दोन वेगवेगळी पथक तयार करुन सदर ठिकाणी छापा टाकला. त्या ठिकाणी विजया पोपट शितोळे वय 55 वर्षे, रा. कारेगाव, , ता. शिरुर, जि. पुणे हिच्या ताब्यात एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये 140 ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ मिळून आला आहे. त्याचप्रमाणे गोपनिय माहितीच्या आधारे रांजणगाव येथील हेमंत पवार हा देखील अशाच प्रकारे गांजा विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने रांजणगाव येथे छापा टाकला असता सदर ठिकाणी हेमंत पवार रा. रांजणगाव, ता. शिरुर, जि. पुणे याच्या घरी 235 ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ मिळुन आला . असा एकूण 375 ग्रॅम वजनाचा 3,750/रु. किंमतीचा गांजा पोलीसांनी दोन्ही ठिकाणावरुन जप्त केला आहे. तसेच रांजणगाव एमआयडीसी परिसरातील कारेगावचे हद्दीतील आय.टी.आय. शेजारी काही इसम नेहमीच गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याबाबत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना माहिती मिळाल्याने त्याठिकाणी छापा टाकला असता 1) सोमनाथ दत्तात्रय नवले वय 31 वर्षे, (2) प्रथमेश संतोष नवले वय 21 वर्षे, दोन्ही रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे. हे एका चिलीमद्वारे गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करतांना मिळुन आले आहेत. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक सविता काळे, पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, सहा. फौज. दत्तात्रय शिंदे, पो.हवा. विजय सरजिने, म.पो.हवा. विद्या बनकर, चालक पो.हवा. माऊली शिंदे व पो.कॉ. उमेश कुतवळ यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहा. फौज. दत्तात्रय शिंदे व पो.हवा. अभिमान कोळेकर, करत आहेत.