[ रत्नागिरी/ प्रतिनिधी ]
तालुक्यात भारतीय घटनेचे निर्माते महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत अवमानकारक घटना वारंवार घडत आहे. अशीच एक घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. विजय माने (राहणार किर्तीनगर- कोकणनगर) याने डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल व्हॉट्सॲप गृपवरून आक्षेपार्ह विधान केले. या विधानावरून आता आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी संतप्त झाले आहे. मात्र रत्नागिरी पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून पोलीसांवर टीकेची झोड उठवली जात आहे.
ज्या महामानवाने अहोरात्र मेहनत घेत स्वतःच्या आजारपणाची काळजी न करता देशासाठी कष्ट घेऊन भारतीय संविधान तयार केले. त्या संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करण्यात येत असतील तर ते दुर्दैव म्हणावे लागेल. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून न्याय, स्वातंत्र्य, समता,एकता, बंधुता ही मूल्य प्रत्येक भारतीयाला दिली आहे. तसेच देशाला बलाढ्य अशी लोकशाही प्रधान केली आहे. मात्र रत्नागिरी सारख्या रत्नांच्या भूमीत महामानव डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्याबाबत अवमानकारक घटना वारंवार घडत आहे. विजय माने या व्यक्तीने 'स्वराज्य ' नावाच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानासंबधित आक्षेपार्ह विधान केले आहे. केलेल्या विधानाचा फोटो सर्वत्र व्हायरल झाला असून तालुक्यातील संविधान प्रेमी, आंबेडकरवादी जनता आक्रमक होण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या विजय माने याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाने अद्याप गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. विजय माने हा आमदार उदय सामंत व त्यांचें बंधू यांचा कट्टर समर्थक असल्याचे समोर आले आहे.
या घटनेवरून बुधवारी रात्रीच्या सुमारास आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते शहर पोलीस स्थानकात दाखल झाले. पोलिसांकडे माने विरोधात गुन्हा दखल करून अटक करण्याची मागणी केली. परंतु पोलिसांनी सर्व माहिती घेऊन दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांना येण्यास सांगितले. दरम्यान संबधित माने या व्यक्तीला पोलिसांनी बोलावून त्याच्याशी चर्चा केल्याचे बोलले जात आहे. आधीच संतप्त झालेले कार्यकर्ते पोलिसांच्या भूमिकेवरून आणखीच खवळले आहेत. यापूर्वी देखील रत्नागिरी तालुक्यात अवमानकारक घटना घडल्या आहेत. त्यावेळी ही पोलिसांना गांभीर्य नसल्याचे चित्र आपल्या कृतीमधून दाखवून दिल्याचा आरोप संतप्त कार्यकर्त्यांमधून पोलिसांवर केला जात आहे. पुन्हा एकदा पोलीसांनी तशाच स्वरूपाची भूमिका घेतल्याने तालुक्यातील विविध आंबेडकरी संघटना आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. एकूणच, रत्नागिरी पोलिस प्रशासन यापूर्वी घडलेल्या प्रकरणात नरमाईची भूमिका घेत असल्याने या प्रकरणातही पोलिसांवर आता अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
पोलिस प्रशासनावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी आहे. घटनेला दोन दिवस उलटूनही कारवाईची प्रक्रिया झालेली नाही. दुसऱ्या दिवशी ही आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी शहर पोलिसांना आंबेडकरी पदाधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. आम्ही कायद्यातील तज्ञ लोकांना विचारणा करून कार्यवाही करू अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. मात्र पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्था राखून आरोपी आमदार समर्थक असल्याने त्याला अभय देण्याचा प्रयत्न करून आंबेडकरी कार्यकर्त्यांना आक्रमक पवित्रा घेण्यास भाग पाडत आहे का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.