शिरुर - शिरुर शहरालगत घोड नदीपात्रात रस्सीने बांधलेल्या अज्ञात तरूणाच्या खूनाचा उलगडा करुन आरोपींना अटक करण्यात शिरूर व स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीसांना यश आले आहे . कृष्णा गोकुळ विघ्ने वय ३२ वर्ष, रा. आनंदगाव, ता. शिरूर कासार, जि.बीड असे खून झालेल्याचे नाव आहे . याप्रकरणी तीन आरोपीना अटक केली आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर येथील पाचर्णे मळा येथील घोडनदीपात्रात रामभाऊ पाचर्णे यांच्या शेताजवळ ३० ते ३५ वर्षाच्या अनोळखी पुरूष यास मारहाण करून काळया, लाल व पांढरे रंगाचे दोरीने हातपासुन पायापर्यंत ठिकठिकाणी बांधून घोडनदीत टाकण्यात आले होते . मृतदेह बरेच दिवस पाण्यात राहिल्याने मयताचा चेहरा व पूर्ण शरीर विद्रूप झालेले होते. प्रेताची ओळख पटविणेकामी प्रेताचे अंगावर केवळ कपडे, खिशात मोटर सायकलची चावी तसेच त्याचे डावे हाताचे अंगठयाजवळ M असे गोंदलेले होते. यावरून मयताची ओळख पटविणे अत्यंत आव्हानात्मक असताना केवळ याच पुराव्यांच्या जोरावर राज्यभर मिसींग व्यक्ती चेक करून, वर्तमानपत्रात प्रसिध्दी देवुन, बातमीदारांचा वापर करून अनोळखी मयत इसमाची ओळख पटवली पोलीस तपासामध्ये मयताचे नांव कृष्णा गोकुळ विघ्ने वय ३२ वर्ष, रा. आनंदगाव, ता. शिरूर कासार, जि.बीड असे निष्पन्न झालेले होते. मयत कृष्णा विघ्ने यास दारू पिण्याचे व्यसन होते त्यामुळे तो दारूच्या नशेमध्ये त्याचे नातेवाईकांना शिवीगाळ मारहाण करीत होता तसेच यातील आरोपी व त्यांचा जमिनीच्या विक्रीचा पैशाचे वाटपाचे कारणावरून वाद होता त्या कारणावरून यातील आरोपी यांनी कृष्णा यास व्यसनमुक्ती केंद्रात नेतो असा बहाणा करून कृष्णाला बांबुचे दांडक्याने मारहाण करून त्यास दंडापासुन ते पायापर्यंत दोरीने बांधुन त्यास आनंदगाव, ता. शिरूर कासार, जि.बीड येथुन आरोपी याचे गाडीमध्ये घातले व पुणे नगर रस्त्यावरील शिरुर जवळील सतरा कमान पुलावरून घोड नदीपात्रामध्ये जिवंत टाकुन त्याचा खुन केल्याचे निष्पन्न झालेले आहे. मयताची ओळख पटल्यानंतर आरोपीच्या शोध घेण्याकरिता पोलीसांनी छत्रपती संभाजीनगर , बीड, अहमदनगर या ठिकाणी वेगवेगळ्या टीम रवाना करून जागोजागी गुन्हयात सहभागी असणारे आरोपी १) अजिनाथ गोकुळ विघ्ने वय २६ वर्ष, रा . आनंदगाव, ता . शिरून कासार, जि.बीड २) गणेश प्रभाकर नागरगोजे वय २९ वर्ष, रा पीरसाहेब चौक ,निबळक ,ता.जि .अहमदनगर ३) पाडुरंग अर्जुन विघ्ने वय ५० वर्ष, रा. आनंदगाव, ता. शिरूर कासार, जि. बीड याना अटक केली आहे . गुन्हयाचा पुढील तपास संदीप यादव, सहाय्यक  पोलीस निरीक्षक हे करीत असुन तीन ही आरोपींना न्यायालयाने ता. १०/०२/२४ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे . हा तपास पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव, पीएसआय एकनाथ पाटील, पोलीस हवालदार अरूण उबाळे, परशराम सांगळे, पोलीस नाईक नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, विकी यादव, संतोष साळुंखे तसेच स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांचेकडील पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहाय्यक फौजदार तुषार पंधारे, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, यांनी केला .