रत्नागिरी गटविकास अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव? 

तत्कालीन सरपंच हे आमदारांचे खंदे समर्थक 

रत्नागिरी /प्रतिनिधी

तालुक्यातील सन २०१४-२० मधील वाटद मिरवणे ग्रामपंचायतीमधील शौचालय(संडास )घोटाळा प्रकरणामध्ये प्रशासन तात्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांना पाठीशी घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. घोटाळ्यात दोषी आढळलेल्या तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच व संबंधित अधि यांच्यावर रत्नागिरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे. पी. जाधव हे शासन परिपत्रकानुसार फौजदारी कारवाई का करत नाही? असा संतप्त सवाल तक्रारदार रहाटे यांनी माध्यमांद्वारे विचारला आहे.

वाटद ग्रामपंचायतला सन २०१४-१५ ते २०१९-२० या कालावधीमध्ये वैयक्तिक शौचालयाचे अनुदानापोटी एकूण २४४ लाभार्थ्यांची रक्कम रुपये २७,८०,०००/- देण्यात आले होते. त्यापैकी रु. १५३६०००/- रक्कम लाभार्थ्यांच्या वैयक्तिक बँक खाती जमा करण्यात आली. उर्वरित रक्कम रु. १२४४०००/- ग्रामपंचायतीकडे लाभार्थ्याच्या वैयक्तिक बँक खाती जमा करण्यासाठी देणेत आलेली होती. मात्र या शौचालयाच्या अनुदानात लाखों रुपयांचा अपहार झाल्याचे सिद्ध होऊन सुद्धा रत्नागिरी गटविकास अधिकारी जे.पी जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई हे संबधित तत्कालीन ग्रामविकास अधिकारी श्री जयकिसन आशिराम आडे, तत्कालीन सरपंच अनिकेत सुर्वे व संबंधित अधि यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप निलेश रहाटे यांनी केला आहे. 

या शौचालय घोटाळ्यात दोषी आढळलेले तात्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे. संबधितांवर शिस्तभंगाची कारवाई प्रास्तावित करत आहोत असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र गटविकास अधिकारी हे केवळ शासन परिपत्रकानुसार संबंधीतांकडून वसुली करून घेत असल्याचे सांगतात. परंतु इतके महिने उलटले तरीही प्रशासनाने अद्याप घोटाळेबाज संबधीतांवर गुन्हा नोंद केलेला नाही त्यामुळे या घोटाळ्यात गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचा देखील सहभाग आहे की काय, असा ही संशय आता बळावत आहे. 

दरम्यान, चुकीची योजनेची बिल व त्यावर केलेली खाडा-खोड यांची बिले स्वतः तक्रारदार रहाटे यांनी गटविकास अधिकारी जाधव यांना सादर केली होती. परंतु उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद, रत्नागिरी) यांना सादर केलेल्या अहवालात तसे काहीच नमुद नसल्याचे समोर आले आहे. यामुळे आता तक्रारदार निलेश रहाटे व ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. एकूणच या सर्व घोटाळा प्रकरणात गटविकास अधिकारी जाधव हे संबंधीत तत्कालिन ग्रामसेवक, सरपंच यांना पाठीशी घालण्याची आपली प्रशासकीय चलाखी दाखवत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. 

अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव ?

घोटाळ्यातील दोषी तात्कालिन सरपंच अनिकेत सुर्वे हे उदय सामंत यांचे खंदे समर्थक आहेत. सद्या ते शिवसेना शिंदे गटाचे विभाग संघटक (वाटद जिल्हा परिषद गट) आणि युवा सेना विभाग प्रमुख या पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार निलेश रहाटे यांनी रत्नागिरीचे लाडके पालकमंत्री उदय सामंत यांना देखील पत्रव्यवहार केले आहे. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे रहाटे यांनी सांगितले. अशा घोटाळा प्रकरणात जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जातीने लक्ष घालून संबंधीत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश तात्काळ दिले पाहिजेत. पण घोटाळ्यात कार्यकर्ता पदाधिकारी न पाहता कारवाईचे आदेश देतील का ? शासन परिपत्रकानुसार या घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी यांची आहे. मात्र कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आहे का? असा ही प्रश्न तक्रारदारांनी उपस्थित केला आहे. 

ग्रामपंचायत समोरच आत्मदहन करण्याचा इशारा

वाटद ग्रामपंचायत मध्ये हा एकच घोटाळा नसून आजून असे बरेज घोटाळे उगडीस आणार आहोत. या घोटाळा प्रकरणात अधिकाऱ्यांनी जेवढा फौजदारी कारवाईसाठी वेळकाढूपणा केला आता पुरे.... संबंधित दोषींवर तत्काळ कारवाई करावी अन्यथा आतापर्यंत झालेल्या मानसिक त्रासामुळे पाटपुरावा केलेले सर्व पेपर घेऊन वाटद मिरवणे ग्रामपंचायत समोर आत्मदहन करण्याचा इशारा निलेश रहाटे यांनी दिला आहे. तसेच याला संबंधित अधिकारी हेच दोषी असतील असे ही पुढे सांगितले आहे.