रत्नागिरी :शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लांजा- राजापूरचे आमदार डॉ. राजन साळवी यांच्यासह पत्नी व मुलावर साडेतीन कोटींची बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने गुन्हा दाखल केला आहे. आ. साळवी व कुटुंबीयांवर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच रत्नागिरीसह राजापूर, लांजा, चिपळूण व सिंधुदुर्गमधून उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आ. साळवींच्या घरी मोठ्या संख्येने जमा झाले होते.
मी कोणतीही चूक केलेली नाही. मी दोषी नाही, त्यामुळे निश्चिंत आहे. प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्याची हिंमत परमेश्वराने दिलेली आहे. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक केले तरी चालेल मी घाबरत नाही, अशी स्पष्ट भूमिका राजापूरचे आमदार तथा ठाकरे सेनेचे उपनेते राजन साळवी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मांडली.
यापुढे ते म्हणाले की, लाचलुचपत प्रतिबंध विभागाची पहिली नोटीस आली तेव्हापासून मी चौकशीला सामोरे जात आहे. त्यांना जी माहिती हवी ती प्रामाणिकपणे देण्याचा मी प्रयत्न केला आहे. मी काही दिवसांपूर्वी सांगून आलो होती की, आता आलो ते शेवटचा आलो. यापुढे तुमची नोटीस आली, तरी मी येणार नाही. त्याचदिवशी वाटले होते की, ही लोक माझ्यापर्यंत पोहोचतील. दोन दिवसांपासून ही मंडळी रत्नागिरीत आहेत. रत्नागिरीत एका हॉटेलमध्ये ते उतरले आहेत. ते माझ्या घरापर्यंत येणार हे माहीत होते, तशी माझी मानसिकता होती, असे त्यांनी सांगितले.
सत्तेच्या माध्यमातून आम्हाला त्रास देणे सुरू आहे. पण मी निर्दोष आहे. मी काय आहे, हे मला स्वतःला, कुटुंबाला, लोकांना आणि पक्षाला माहिती आहे. त्यामुळे मी कशालाही घाबरत नाही. त्यांनी जे पैसे सांगितले, दाखवले, ते कुठले हे माहिती नाही. उलट आमच्यावरील कर्जही त्यांनी यात दाखवावं, असेही ते म्हणाले.
पत्नी, मुलावर गुन्हा दाखल होणे दुर्देव
माझ्यावर गुन्हा दाखल केला तरी चालेल; पण माझ्या पत्नीवर आणि मुलावर गुन्हा दाखल केला आहे. याची खंत वाटते. याचे गंभीर परिणाम या सरकारला भोगावे लागतीलच, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी यावेळी दिला.
माझा पक्षावर विश्वास
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मी लाडका सैनिक होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निष्ठावंत सैनिक आहे. माझ्या पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा पक्षावर विश्वास आहे. असे त्यांनी सांगितले.