वडगाव शेरी भागातील एका पिठाच्या गिरणीमालकाने पुणे महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या वेळेत बदल करून बोर्डवर खाडाखोड करत दोन तासांची वेळ वाढविल्याने मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर मुक्ताजी शिंदे (72, रा. वडगाव शेरी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पुणे मनपाच्या वतीने चंदननगर पोलिस ठाण्यात व्यंकटेश मारुती पवार (वय 29, रा. वाघोली) यांनी आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 28 जानेवारी 2022 ते 18 जुलै 2022 दरम्यान घडला.

आरोपी शंकर शिंदे यांची वडगाव शेरी परिसरात दत्तप्रसाद हौसिंग सोसायटी येथे श्री गणेश फ्लोअर मिल आहे. ही फ्लोअर मिल चालविण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने परवाना देण्यात आला होता. पालिकेने दिलेल्या परवान्यात गिरणी चालविण्याची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात अशी नमूद करण्यात आली होती. या परवान्यात गिरणीची वेळ सकाळी सात ते सायंकाळी नऊपर्यंत असा खोटा मजकूर तयार करून परवान्यातील वेळेत फेरफार करीत महानगरपालिकेच्या फसवणूक केल्याने आरोपी शंकर शिंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दिलीप पालवे पुढील तपास करत आहेत.