शिरुर: गेली अनेक वर्ष श्रीगोंदा, पारनेर तसेच शिरुर तालुक्यातील शेतकरी आपला शेतीमाल मोठया प्रमाणात शिरुर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. गेल्या एक वर्षापुर्वी कोरोना काळानंतर वेळेत बदल करत शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सायंकाळी 6 ते 9 हि वेळ निश्चित केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनासोयीस्कर झाले होते. परंतु ऐन थंडीच्या दिवसात माल विक्रीसाठी पुन्हा पहाटे 2 ते सकाळी 7 पर्यंत वेळ बदलण्याचा घाट शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीने घातल्याने शेतकरी आक्रमक झाले असुन काही ठराविक व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठीच वेळ बदलण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

सध्या मोठया प्रमाणात थंडी सुटली आहे तसेच शिरुर तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात बिबटयाचे वास्तव्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. सध्या कोणत्याच मालाला बाजारभाव नसल्याने आधीच शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यातच शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतीमाल विक्रीची वेळ बदलन्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. 

याबाबत शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सध्या सायंकाळी 6 वाजता बाजार समितीत मालविक्री केली जाते. परंतु जागा मिळविण्यासाठी शेतकरी लवकरच बाजार समितीत येतात. त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांच्या ग्राहकांवर परिणाम होतो. तसेच बाजार समितीत कांदा मार्केट, सोयाबीन खरेदी चालु असते. त्याचही नियोजन आम्हाला करावं लागत. अनेक शेतकऱ्यांनी पहाटे मार्केट चालु करण्याचीही मागणी केली आहे. त्यावर आज दुपारी 12:30 वाजता शिरुर येथील मार्केट कमिटीच्या कार्यलयात शेतकऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी 'शिरुर तालुका डॉट कॉम' शी बोलताना सांगितले.

शेतकऱ्यांसाठी शेतकरी सेना मैदानात...

शिरुर बाजार समितीने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी करत ठाकरे गटाच्या शिवसेना शेतकरीसेना आता मैदानात उतरली असुन कृषी उत्पन्न बाजार समितीला काल शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यामध्ये शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीसाठी सांयकाळी मार्केट खुले करण्यात यावे, शेतमाल गाड्यांना पार्किंग सुविधा,पिण्याचे पाणी,शेतमाल विक्रीसाठी जागा तसेच शेतकरी हा प्रथम मार्केट दुवा असल्याने त्याला सर्व सुविधा देण्यात याव्या या मागण्या करण्यात आल्या. त्यावेळी शेतकरीसेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ ,उपतालुकाप्रमुख अनिल पवार, जिल्हा समितीचे कैलास भोसले, तालुका सल्लागार संतोष काळे, शाखाप्रमुख आबासो काळे, बहुजन मुक्ती पार्टीचे नाथा पाचर्णे,फिरोज सय्यद तसेच असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.