आदिवासी विद्यार्थ्यांनी केली भेटीची मागणी*

पत्र पाठवून, पेढे वाटून, ढोल-ताश्याच्या तालावर आदिवासी नृत्य सादर करून केला आनंद साजरा

 भारताच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्षाच्या वाटचालीत द्रौपदी मुर्मू यांच्या रुपानं पहिल्यांदाच आदिवासी व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानिमित्त पुण्याजवळील फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याठिकाणी आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 400 आदिवासी विद्यार्थी आणि ईश्वर पूरम प्रकल्पांतर्गत अरुणाचल प्रदेश व नागालँड मधील आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांनी पेढे वाटून, ढोल-ताश्याच्या तालावर आदिवासी नृत्य सादर करून आणि पत्र लिहून द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या व राष्ट्रपती झाल्यानिमित्त अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या पत्रात मुर्मू यांच्याकडे भेटीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आदिवासी व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. विद्यार्थ्यांनी द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा देताना व त्यांचे अभिनंदन करतानाच त्यांना भेटीची इच्छा देखील व्यक्त केली. द्रौपदी मुर्मू या आदर्श व्यक्ती असून त्या आमच्या प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्याप्रमाणे आम्हालाही देशाची व समाजाची सेवा करायची आहे, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

देशाच्या दृष्टीकोनातून ही अत्यंत महत्त्वाची व अभिमानाची घटना आहे. त्यानिमित्तानं विद्यार्थ्यांनी द्रौपदी मुर्मू यांचे पोस्टर उंचावत, एकमेकांना पेढा भरवत हा आनंद साजरा केला आहे. यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांनी ढोल-ताश्याच्या तालावर आदिवासी समाजाचे पारंपरिक नृत्य सादर करीत द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, शिक्षण संचालक नरहरी पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर, टेन टी इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य पी शोफीमोन, लोकसेवा इंग्लिश मिडीयम स्कूल चे प्राचार्य देनसिंग, लोकसेवा गर्ल्स मिलिटरी स्कूल च्या प्राचार्या लक्ष्मी कुलकर्णी, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.