शिरूर ( वार्ताहर ) : अनाथांच्या माई पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या 'द मदर ग्लोबल फाउंडेशन' संचालित श्री मनशांती छात्रालय, शिरूर या संस्थेमधील मुलांना देशातील वेगवेगळ्या संरक्षण क्षेत्राची माहिती मिळावी व  संरक्षण क्षेत्रात काम करण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी *"प्रेरणासिंधु"* हा कार्यक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विनय सिंधुताई सपकाळ यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाचे औचित्य साधुन  कर्नल महेश शेळके यांचे" भारतीय संरक्षण क्षेत्रातील संधी " या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. कर्नल महेश शेळके यांचे मुलांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले, कर्नल शेळके यांनी संस्था पाहून संस्थेची संपूर्ण माहिती घेतली व माईंन विषयी माईंच्या महान कार्याविषयी आदर व्यक्त केला,  कर्नल शेळके यांनी मुलांना भारतीय सैन्यातील त्यांच्या पोस्ट व कामाची कल्पना देऊन भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठीची प्रक्रिया, प्रशिक्षण, सैन्यादलाचे प्रकार, त्यातील नियम व अटी या विषयांवर मार्गदर्शन करून मुलांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली व त्यांच्यात देशसेवेची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रोत्साहित केले, आपल्या संस्थेतील मुलांना भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी लागणारे प्रशिक्षण व मदत मी माझ्या परीनं नक्कीच करेन असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.संस्थेतील मुले त्यांच्या व्याख्यानाने खूप प्रभावित झाली. त्यातील काही मुलांनी आर्मी मध्ये भरती होण्याचे इच्छाही व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर ओंकार यांनी केले  श्री. मनशांती छात्रालय,शिरूर संस्थेचे अध्यक्ष विनय सिंधुताई सपकाळ यांच्या वतीने यश सपकाळ यांनी कर्नल महेश शेळके व समीर ओंकार यांचे आभार मानले. यावेळी श्री मनशांती छात्रालयाच्या अधीक्षिका मीनाक्षी लटांबळे, अधिक्षक  दिनेश लोखंडे, वैभव दहेकर, भाऊसाहेब मांदळे, गणेश शनवारे आदी  कर्मचारी वर्ग उपस्थीत होता.