शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी साठी जिल्हाधिकारी कार्यालयात जनकल्याण कक्ष सुरू करा अशी मागणी मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ संजय तांदळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सर्वसामान्य जनता ,शेतकरी ,महिला ,विद्यार्थी यांचा राज्य शासकीय विविध विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो.दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख,पारदर्शक ,कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी शासन आपल्या दारी या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ दिनांक 13 मे 2023 रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दौलत नगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते झाला.या अभियानाचा मुख्य उद्देश हा शासनाच्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना त्वरित मिळावा यासाठी, प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात शासकीय योजना राबविण्यात येणार असून, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त प्रत्येक जिल्ह्यात ७५ हजार लाभार्थ्यांना एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.याशिवाय शासकीय निर्धारित शुल्कात 200 हून अधिक योजनांचा लाभ मिळण्यासाठी कमीत कमी कागदपत्रे सादर करून जलद मंजुरी मिळणार आहे.पहिल्यांदाच सर्व प्रशासन हर घर दस्तक च्या माध्यमातून प्रत्येकाला या योजनेची माहिती मिळणार आहे राज्यभर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरू करण्यात आला आहे जिल्हास्तरावर देखील शासकीय योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कायमस्वरूपी जनकल्याण कक्ष स्थापना करून त्याद्वारे नित्य दिनी वर्षभर अकरा ते एकच्या दरम्यान शासकीय योजनेच्या लाभार्थींच्या तक्रारीची दखल घेऊन त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळून देण्यात यावा, अशी मागणी बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे डॉ संजय तांदळे यांनी केली आहे .