बाजारतळ मैदानात झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून गेली चारचाकी

व्यक्तीचा मृत्यू ; लोणीकंद पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

वाघोली येथील बाजारतळ मैदानातील भाजी मंडईच्या शेजारील मोकळ्या मैदानात चटईवर झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून अज्ञात चारचाकी गाडी गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.४) सकाळी उघडकीस आली याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील बाजारतळ मैदानातील भाजी मंडईच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या मैदानात एक ३६ वर्षीय व्यक्ती चटईवर झोपली होती. त्या व्यक्तीच्या आजूबाजूला भाजी घेऊन येणारी वाहने थांबलेली होती. सकाळी त्या व्यक्तीच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मयत व्यक्तीला शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. त्याच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेले असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. सदर व्यक्तीची ओळख पटलेली नाही.