आजादी का अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषद प्रशाला व केंद्रीय प्राथमिक शाळेची आडूळ मध्ये भव्य रॅली

औरंगाबाद;

भारतीय स्वातंत्र्यास ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे हे वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात रहावी या उद्देशाने पैठण तालुक्यातील आडूळ बु ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्रशाला व केंद्रीय प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवारी ( दि ६ रोजी ) सकाळी गावात " हर घर तिरंगा'" या अभियानांतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी व प्रशालेतील इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ढोल पथकाच्या अतिशय चित्ताकर्षक चालीवर विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.अतिशय उत्साहाने विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. या रॅलीची लक्षवेधी बाब म्हणजे विद्यार्थी व शिक्षक यामध्ये राष्ट्रीय पोशाख परिधान करून सहभागी झाले होते.प्रशालेचे मुख्याध्यापक नागेश चरपेलवार,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कैलास व्यवहारे,ग्रामविकास अधिकारी बळीराम कळमकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रॅलीला सुरुवात झाली.भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील विविध क्रांतीकारक, स्वातंत्र्य सैनिक, राष्ट्रीय नेत्यांची वेशभूषा या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी करुन संपूर्ण आडूळ वासियांचे लक्ष वेधून घेतले. क्रीडा शिक्षक अनिल चव्हाण,शिवनारायण काळे, संतोष चव्हाण, जयसिंग राठोड यांनी आपल्या पहाडी आवाजात घोषणा देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.या आगळ्या वेगळ्या व भव्य रॅलीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शालेय समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.ही भव्य रॅली यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख ज्योती मादनकर,रत्नमाला अंकमवार,पार्वती पाटील, वैशाली तारो,कल्पना सोनवणे,पंढरीनाथ पाटील,कैलास वाढवे,प्राथमिक शाळेचे शिक्षक सुरेश जाधव,शेख मोईनोद्दीन,कैसर कादरी,सय्यद शामद यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी यासाठी प्रयत्न केले.शेवटी मुख्याध्यापक नागेश चरपेलवार यांनी विद्यार्थ्यांना " हर घर तिरंगा'" या अभियानाचा उद्देश समजावून सांगत प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सर्व नियमांचे पालन करून तिरंगा ध्वज उभारण्याचे आवाहन करून सांगता केली.