चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्या वतीने बालकुमारांमध्ये राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजावेत या हेतूने झालेल्या मासिक मेळाव्याचे दुसरे सत्र नुकतेच स्वा. विनायक दामोदर सावरकर स्मृतिदिन आणि मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर संपन्न झाले. 

वाचनालयाच्या कलादालनात संपन्न झालेल्या या मेळाव्यात स्वातंत्र्यवीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मेघ देवळेकर व ओजस कुंटे यांनी 'जयोsस्तु ते' हे स्वतंत्रता स्तोत्र गायन केले. कल्याणी मंदार ओक हिने स्वा. सावरकरांची देशभक्ती प्रकट करणारे भाषण केले. सौ. मेघना चितळे यांनी 'बाल बलिदानी' या शीर्षकांतर्गत १९४२च्या आंदोलनात निर्भयपणे तिरंगा फडकावून प्राणार्पण करणाऱ्या आसामच्या कनकलतेची कथा परिणामकारक शब्दात सांगितली. सावरकरांच्या भाषाशुद्धी चळवळीची, नवशब्द निर्मितीची माहिती देण्यात आली. फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेषांना अनुसरून संत गाडगेबाबा, संत रामदासस्वामी, क्रांतिकारक वा. ब. फडके, समाजसुधारक गो. कृ. गोखले, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी महनीय व्यक्तींचेही पुण्यस्मरण ह्या कार्यक्रमात आवर्जून करण्यात आले. को. म. सा. प. च्या अध्यक्षा डॉ. सौ. रेखा देशपांडे यांनी सावरकरांच्या ऊर्जस्वल कवितांची विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती सांगितली. या कवितांच्या आधाराने मुलांशी प्रश्नोत्तररूप संवाद करण्यात आला. यावेळी मराठी राजभाषा दिन निमित्ताने ‘मातृभाषा मराठी’ विषयीचे चिंतन करण्यात आले. मुलांनी मराठीची महती सांगणारी पाठ्यपुस्तकातील कविता तालासुरात म्हटली. मराठीची तोडफोड न करता जास्तीत जास्त शुद्ध मराठी बोलण्याचे व लिहिण्याचे आवाहन यावेळी डॉ. सौ. देशपांडे यांनी केले. 

कार्यक्रमाचा समारोप स्वा. सावरकरकृत शिवरायांची आरती म्हणून मुलांनी केला. यावेळी को. म. सा. प. चे जिल्हा प्रतिनिधी राष्ट्रपाल सावंत आणि पालकही उपस्थित होते. पुढील मासिक मेळाव्यासाठी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एकत्र येण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.