अकलूज ग्रामपंचायतीचे आता नगर परिषदेमध्ये रूपांतर झाले असून अकलुज ग्रामपंचायत अस्तित्वात असताना 2009 साली महर्षी चौक येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा समाजबांधवांनी पुतळा बसविलेला होता. परंतु जागेअभावी व काही राजकीय लोकांच्या दबावापोटी हा पुतळा तेथून काढण्यात आला. तेव्हापासून समाजबांधवांची अकलूजमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व्हावे, ही मागणी आहे.

अकलूज शहर ही माळशिरस तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. अशा ठिकाणी मुख्य बाजारपेठ व दळणवळणाचे मुख्य केंद्र बनलेले आहे. तरी अकलूज नगरपरिषदेने चौकाच्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक व उद्यानासाठी जागा उपलब्ध करून तिथे भव्यदिव्य असे स्मारक उभारावे, अशी समाजभावना लक्षात घेऊन युवासेना नेते प्रा. सतीश कुलाळ यांनी अकलूज नगर पंचायतचे मुख्य अधिकारी यांना भेटून आराखड्यात समावेश करून भव्य स्मारक उभारावे, अशी निवेदनामार्फत मागणी केली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज शहर अध्यक्ष जाकीर शेख हेही उपस्थित होते. समाज बांधवांच्या भावना लक्षात घेऊन मुख्याधिकारी यांनी लक्ष घालून यामध्ये पाठपुरावा करून या स्मारकाचे काम लवकरात लवकर मार्गी लागा लावावे अशी मागणी या निवेदनामार्फत प्रा.सतीश कुलाळ यांनी केलेली आहे.