पोलीस दलात कर्तव्य बजावत असतांना अनेकदा पोलीस अधिकारी व अंमलदार वेगवेगळ्या कारणांनी मयत होतात. अशावेळी घरातील कर्ता कुटुंबप्रमुख कर्तव्य बजावत असतांना मयत झाल्यामुळे त्या कुटुंबाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पोलीस दलात कर्तव्य बजावत असतांना मृत पावलेल्या पोलीसांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत शासन निर्णय आहे.

     त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करून अनुकंपा नियुक्तीचे प्रमाणित कार्यपद्धतीनुसार अनुकंपा तत्वावर ०५ उमेदवारांना पोलीस शिपाई पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. गतवर्षीसुद्धा १५ उमेदवारांना पोलीस शिपाई तर ०३ उमेदवारांना कनिष्ठ लिपिक पदावर असे एकूण १८ उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर दि.२३.०२.२०२३ रोजी वाशिम जिल्हा पोलीस दलात अनुकंपा तत्वावर नव्याने रुजू झालेल्या ०५ नवनियुक्त पोलीस अंमलदारांच्या स्वागत सोहळ्याचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथे करण्यात होते. यावेळी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी नव्याने रुजू झालेल्या पोलीस अंमलदारांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन संवाद साधला.त्यावेळी पोलीस अंमलदारांना महाराष्ट्र पोलीस दलाची मान उंचावण्याकरिता सर्वोत्कृष्ट कर्तव्य पार पाडणे, पोलीस दलासामोरील आव्हाने त्याचबरोबर शिस्त व प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. नवीन हजर झालेल्या पोलीस अंमलदारांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त करत विनाविलंब अनुकंपा भरती प्रक्रिया राबवून पोलीस दलात सामावून घेतल्याबद्दल मा.पोलीस अधीक्षक साहेबांचे आभार व्यक्त केले.

     सदर कार्यक्रमास मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली सपोनि.विनोद झळके, जिल्हा विशेष शाखा, वाशिम व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थितीत पार पडला.