राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील 1331 दावे निकाली

औसा  : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लातूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्ष सुरेखा कोसमकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील 1331 दावे निकाली काढण्यात आले.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई, कौटुंबिक न्यायालय व ग्राहक मंच, भूसंपादन, लवाद, हिंदू विवाह कायदा अंतर्गत प्रकरणे, कलम 138 एन. आय. अॅक्टची प्रकरणे, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणे व कोर्टात प्रलंबित असलेली तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. तसेच वादपूर्व प्रकरणामध्ये सर्व बँकांचे वसुली दावे, वित्त संस्था तसेच भ्रमणध्वनी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड यांची रक्कम वसुली प्रकरणे, पोलिसांची वाहतुक ई-चलनाबाबतची प्रकरणे ठेवण्यात आलेली होती.

विमा कंपन्यांचा या राष्ट्रीय लोक अदालतीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. नॅशनल इन्शुरन्स कंपनीने एम. ए. सी. पी. के. 132/2022 खलेदा व इतर / नॅशनल इन्शुरन्स कंपनी व इतर) या प्रकरणामध्ये 16 लाख रुपयांमध्ये तडजोड झाली. या प्रकरणात वादीचे वकील अॅड. एन. जी. पटेल व प्रतिवादीचे वकील अॅड. एस. जी. डोईजोडे यांनी काम पाहिले. पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश जे. एम. दळवी, जिल्हा न्यायाधीश-3 व पॅनल पंच म्हणून अॅड. आर. डी. डांगे यांनी काम पहिले. तसेच अॅड. एस. जी. दिवाण व इतर विमा कंपन्यांचे वकील यांनी राष्ट्रीय लोक अदालतीला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

दुरावलेली मने पुन्हा जुळली; सामोपचाराने मिटला वाद

उदगीर येथील एका युवकाचे 10 मार्च 2019 लग्न झाले. मात्र, छोट्या-छोट्या गोष्टींवरून होणाऱ्या वादामुळे गेल्या दोन वर्षांपासून पती-पत्नी विभक्त राहू लागले. तसेच त्यांचा वाद न्यायालयापर्यंत पोहचला. हे प्रकरण राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते. यामध्ये दोघांनीही प्रेमाने व समजुतीने पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. सामोपचाराने वाद मिटल्याने दोघांची मने पुन्हा जुळली. या प्रकरणात वादीचे वकील अॅड. गणेश एम. कांबळे व प्रतिवादीचे वकील अॅड. एस. बी. आरदे यांनी काम पहिले. पॅनल प्रमुख न्यायाधीश श्रीमती ए. ए. पिरजादे पाटील व पॅनल पंच म्हणून अॅड. पी. एम. कांबळे यांनी काम पाहीले.

या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये लातूर जिल्ह्यातील एकूण 1331 प्रकरणे निकाली निघाली असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती एस. डी. अवसेकर यांनी दिली. या लोक अदालतीला पक्षकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लोक अदालतीचे पॅनेल जिल्हा न्यायालयातील दोन इमारतीत, जिल्हा विधिज्ञ संघ तसेच न्यायालयाच्या परिसर येथे विभागण्यात आले होते.

 जिल्ह्यात एकूण 35 पॅनलद्वारे राष्ट्रीय लोक अदालतीचे कामकाज झाले. यात लातूर तालुक्यातील पॅनलवर न्या. आर. बी. रोटे, न्या. जे. एम. दळवी, न्या. डी. बी. माने असे जिल्हा न्यायाधीश, न्या. पी. बी. लोखंडे, न्या. के. एम. कायगुंडे, न्या. एस. एन. भोसले, न्या. जे. सी. ढेंगळे, न्या. पी. टी. गोटे, न्या. पी. एस. चांदगुडे असे दिवाणी न्यायाधीश व. स्तर, न्या. श्रीमती आर. एच. झा, न्या. एम. डी. सैंदाने, न्या. श्रीमती एस. सी. निर्मळे, न्या. श्रीमती ए. ए. पिरजादे पाटील असे दिवाणी न्यायाधीश, क. स्तर यांनी पॅनल प्रमुख म्हणून कामकाज पाहिले. तसेच या लोकअदालतमध्ये पॅनलवर अॅड. आर. डी. डांगे, अॅड. एस. व्ही. सलगरे, अॅड. एन. पी. गायकवाड, अॅड. शिवाजी फड, अॅड. रेहाना तांबोळी, अॅड. एस. बी. आयनिले, अॅड. जे. आर. यावलकर, अॅड. एस. व्ही. कोंपले, अॅड. टी. डी. काळे, अॅड. पी. एम. कांबळे, अॅड. अंजली जोशी यांनी पॅनल पंच म्हणून कामकाज पाहिले.

राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती एस. डी. अवसेकर, सर्व न्यायाधीश, जिल्हा वकिल मंडळाचे अध्यक्ष अॅड. विठ्ठल व्ही. देशपांडे, उपाध्यक्ष अॅड. किरणकुमार एस. किटेकर, सचिव अॅड. दौलत एस. दाताळ, महिला सहसचिव सुचिता व्ही. कोंपले व इतर पदाधिकारी, तसेच लातूर जिल्हा सरकारी वकील मंडळ व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.