राज्यातील आठ विभागाचे 8 मुलांचे आणि 8 मुलींचे कबड्डी संघ सहभागी
औसा प्रतिनिधी -प्रो-कबड्डीमुळे कबड्डीला चांगले दिवस आले असून लातूरचे क्रीडा संकुल कबड्डीपटूसाठीच्या सरावासाठी सर्वसोयीयुक्त असल्याचे प्रतिपादन लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले.
आज जिल्हा क्रीडा संकुलात 17 वर्षाच्या खालील वयोगटाच्या मुले,मुली यांच्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे उदघाटन लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ऑलिम्पियन व राष्ट्रीय ध्यानचंद पुरस्कार विजेते शाहूराज बिराजदार, कबड्डी खेळातील महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार विजेते गणपतराव माने, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मोईज शेख, शिवछत्रपती पुरस्कार विजेते दत्ता गल्लाले, शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्रीरंग बंडापल्ले,शिवछत्रपती पुरस्कार विजेते धर्मपाल गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे उपस्थित होते.
यावेळी राज्यातून विविध जिल्ह्यातून आलेल्या खेळाडूंसाठी उत्कृष्ट लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी सर्व कबड्डी संघाकडून संचलन करून पाहुण्यांना मानवंदन देण्यात आली.
उदघाटन सामना मुले अमरावती विभाग विरुद्ध पुणे विभाग तर मुलींचा औरंगाबाद विभाग विरुद्ध नाशिक विरुद्ध असा सामना रंगला.
आज रात्री दि. 20 जानेवारी विद्युत प्रकाश झोतात आठ सामने आणि उद्या दि. 21 जानेवारी रोजी रात्री विद्युत प्रकाश झोतात आठ सामने होणार आहेत. या क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा प्रेमींची उत्स्फूर्त गर्दी जमली होती.
यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील लातूर जिल्ह्यातील पदक विजेत्या खेळाडूचा विशेष गौरव करण्यात आला.