शिक्रापुरात फिरणारा तोतया पोलीस अधिकारी जेरबंद
( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील मलठण फाटा परिसरात पहाटेच्या सुमारास पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करुन फिरणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्याला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून चंद्रमणी शशिकांत शेवाळे असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या तोतया पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील मलठण फाटा परिसरातील वाजे गुळाचा चहा येथे आज १९ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास एक पोलीस अधिकारी असून तो संशयित पणे वावरत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांना मिळाली त्यांनतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे, पोलीस हवालदार शंकर साळुंके, होमगार्ड सुहास डांगे यांनी सदर ठिकाणी जात पाहणी केली असता हुबेहूब पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा गणवेश व पेहराव धारण केलेला पोलीस अधिकारी दिसून आल्याने पोलिसांनी सदर पोलीस अधिकाऱ्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांना त्याचेवर संशय आल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली असताना त्याच्याजवळ महाराष्ट्र शासन वित्त विभागाचे सहाय्यक सचिव या पदाचे ओळखपत्र मिळून आले, मात्र तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने तो तोतया पोलीस अधिकारी असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, याबाबत पोलीस हवालदार शंकर नारायण साळुंके रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी चंद्रमणी शशिकांत शेवाळे वय १९ वर्षे रा. मेरी मसकड राजवाडा वक्रतुंड नगर नाशिक मूळ रा. जांबूटके ता. दिंडोरी जि. नाशिक याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुन्ना मुत्तनवार व पोलीस नाईक रविकिरण जाधव हे करत आहे.