करंदीच्या माजी उपसरपंचावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची केली जमीन खरेदीत फसवणूक

( शिक्रापूर प्रतिनिधी ) करंदी ता. शिरुर येथील ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बबलू उर्फ बबन ढोकले यांनी एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची जमीन खरेदी करुन काही जमीन विक्री करुन देखील सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचे लाखो रुपये न देता फसवणूक केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे माजी उपसरपंच बबलू उर्फ बबन सोमनाथ ढोकले याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

                                    सणसवाडी ता. शिरुर येथे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी ज्ञानदेव तनपुरे यांची जमीन असून त्यांनी सदर जमिनीपैकी काही जमीन करंदीचे माजी उपसरपंच बबन ढोकले यांना २०२० मध्ये विक्री केली होती, त्यावेळी ढोकले याने तनपुरे यांना थोडे पैसे देऊन चौदा लाख रुपये नंतर देतो असे सांगितले होते, दरम्यान ढोकले याने सदर जमिनीपैकी काही जमीन अन्य लोकांना विक्री केली मात्र तनपुरे यांनी वारंवार पैशाची मागणी करुन सुद्धा ढोकले याने त्यांना पैसे दिले नाही तसेच पैसे देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे आपली जमीन विक्री व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी ज्ञानदेव गुलाबराव तनपुरे वय ६९ वर्षे रा. कुणाल पार्क सोसायटी सुभाषनगर धानोरी पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी करंदीचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बबलू उर्फ बबन सोमनाथ ढोकले यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार हे करत आहे.