बंगालच्या उपसागरात अंदमानच्या दक्षिणेला हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळं आज (7 डिसेंबरला) चक्रीवादळ  तयार होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ तामिळनाडूची किनारपट्टी आणि पदुच्चेरीच्या उत्तरेकडे सरकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं गुरुवारी (8 डिसेंबर) आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तामिळनाडू, पदुच्चेरी, कराईकल या भागात सात ते 10 डिसेंबर दरम्यान जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. हे चक्रीवादळ मुंबईसह कोकणमधून जाण्याची शक्यता वर्तवली जात असून, याचा विदर्भात कोणताही प्रभाव नसला तरी थंडीचा जोर कमी झाला आहे.

बंगालच्या उपसागरात हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्राला त्याच्या निर्मितीपासून पुढे ताशी 76 किमी वेगाने सरकताना प्रवासासाठी उपलब्ध समुद्रपाणी पृष्ठभाग क्षेत्र अंतर कमी मिळत आहे. सदर चक्रीवादळ सध्या त्याच्या ईशान्य मान्सूनच्या नेहमीसारख्या घडणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेसारखे पूर्व-पश्चिम साधारण 15 डिग्री अक्षवृत्त दरम्यान आग्नेयेकडून वायव्येकडे जात आहे. त्यामुळं त्याचा महाराष्ट्रावर विशेष असा नुकसान होण्याच्या दृष्टीनं काही परिणाम जाणवणार नसल्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. चक्रीवादळ वाऱ्याच्या घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरणाऱ्या स्थितीमुळं त्याच्या अतिबाहेरील परिघ-घेरातून महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येणाऱ्या आर्द्रतेच्या वक्रकार पट्ट्यातील 14 जिल्ह्यात आठवडाभर म्हणजे 9 ते 16 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. वातावरणासहित उरध्व दिशेनं संवहनी प्रक्रियेतून तुरळक ठिकाणी अवकाळी बे-मोसमी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.