रत्नागिरी,( वा.) मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा ईश्वर धाबा येथे नुकताच 6 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात ट्रकमधून प्रवास करणारा एकजण जखमी झाला. त्याला उपचारासाठी रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सोमवार 5 डिसेंबर रोजी नुकताच सायंकाळी 6 वा. सुमारास घडला.
सविस्तर वृत्त असे की, मुंबई गोवा महामार्गाचे एका बाजूचे काम सुरू असल्याने दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू आहे. दरम्यान जाकादेवीहून साताऱ्याच्या दिशेने ट्रकमधून चिरा घेऊन चालक नवनाथ जाधव हा जात होता. यावेळी चालकाने निवळी येथे प्रवासी घेतले. त्यानंतर हातखंबाच्या दिशेने रवाना झाला. मात्र महामार्गावर मातीचा भराव टाकून लेव्हल करण्यात येत आहे. हातखंबा येथील ईश्वर धब्यास्मोरील मातीच्या भरावात ट्रकची चाके रूतल्याने ट्रक डाव्या बाजूला कलंडला. ट्रक कलंडताच गाडीतील सारे चिरे बाहेर फेकले गेले. यामध्ये ट्रकमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांला दुखापत झाली. प्रवाशाचे नाव समजू शकले नाही. ग्रामस्थांनी पीडब्ल्यूडीच्या गाडीने जखमी प्रवाशाला रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी रवाना केले. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच हातखंबा ट्रफिक पोलीस पावसकर, भरणकर तसेच होमगार्ड शिंदे, आणि निंगावले हे घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने ठीक ठिकाणी बोर्ड लावणे आवश्यक आहे. रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेल्या मातीच्या भरावावरुन रात्रीच्या वेळेस मोठ्या ट्रक चालकांना अंदाज येत नसल्याने आणखी अपघात होऊ शकतात, अशी आता भीती व्यक्त केली जात आहे.