वैजापूर :-

तालुक्यातील लासुर येथे स्कुटी वरुन देशी दारूची अवैध वाहतूक करणार्‍या इसमाला पोलिसांनी 41 हजार 800 रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. शनिवार (ता.03) रोजी सकाळच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

याप्रकरणी दिपक सुभाष गोटे (रा. शिरेगाव ता.गंगापूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतेलेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लासुरगाव येथे जिल्हा परिषद शाळेसमोर एक जण अँक्टिवा स्कुटी वर देशी दारूची अवैध वाहतूक करणार असल्याची माहिती खबर्‍यामार्फत पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील व पोलीस नाईक मोईस बेग यांना मिळाली.  सहाय्यक पोलिस अधिक्षक महक स्वामी, पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलिस नाईक मोईस बेग आदींच्या पथकाने सकाळी 11 वाजता माहितीतील ठिकाणी छापा टाकला.या वेळी दिपक गोटे 16 हजार 800 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्यासह पोलिसांना मिळून आला. या बाटल्या परवाना धारक मयूर उमेश जैस्वाल यांच्या कडून अवैध विक्रीसाठी आणल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडुन 16 हजार 800 रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या व 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण 41 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिपक गोटे व मयूर जैस्वाल याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.