मुंबई / प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषदेचा ८४ वा वर्धापन दिन आज राज्यभर "पत्रकार आरोग्य तपासणी दिवस" म्हणून साजरा करण्यात आला.. परिषदेच्या या उपक्रमास राज्यभर जोरदार प्रतिसाद मिळाला.. ७००० पेक्षा जास्त पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांची आज राज्यात आरोग्य तपासणी करण्यात आली.. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येनं पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा हा विश्व विक्रम असल्याचा दावा एस.एम देशमुख यांनी एका पत्रकाव्दारे केला आहे..
पत्रकार समाजासाठी अहोरात्र काम करीत असतात.. मात्र प्रकृतीकडे त्यांचे लक्ष असत नाही. त्यामुळे "एक दिवस आमच्यासाठी" या संकल्पनेअंतर्गत परिषदेचा वर्धापन दिन पत्रकार आरोग्य तपासणी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय परिषदेने चार वर्षांपुर्वी घेतला होता.. त्यास आता जोरदार प्रतिसाद मिळत असून परिषदेचा या उपक्रमाने आता चळवळीचे रूप घेतले आहे.. आज राज्यात १०,००० पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प होता मात्र काही जिल्ह्यात ही शिबिरे नंतर घेतली जाणार असल्याने १०,००० चा आकडा गाठता आला नसला तरी ७०००पेक्षा जास्त पत्रकारांची आज तपासणी केली गेली.. ज्या जिल्ह्यांमध्ये आज पत्रकार आरोग्य तपासणी अभियानास जोरदार प्रतिसाद मिळाला त्यात पुणे, नगर, रायगड, रत्नागिरी, सांगली, बीड, धुळे, नांदेड, वाशिम, अकोला, परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा, नागपूर, गडचिरोली सिंधुदुर्ग, भंडारा, या आणि अन्य काही जिल्ह्यांचा समावेश आहे.. काही जिल्ह्यात स्थानिक अडचणींमुळे त्यांच्याकडे येत्या काही दिवसात ही शिबिरं होतील..
परिषदेच्या आवाहनानुसार राज्यातील जिल्हा संघ, तालुका पत्रकार संघांनी परिषदेचा हा उपक्रम यशस्वी करून दाखवल्याबद्दल एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, राज्य महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन, राज्य डिजिटल मिडिया परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर डॉक्टरांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे त्याबद्दल त्यांचेही आभार.. बीड येथे रोटरी क्लबने शिबिरासाठी मदत केली त्याबद्दल आभार.. रोटरी बीडचे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी यांनाही धन्यवाद