शिरुर: रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील एक्सप्रो इंडीया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तसेच डंकन कंपनीकडे जाणाऱ्या रोडच्या बाजुला असलेल्या मोकळ्या माळरानामध्ये एका 25 ते 30 वयोगटातील अनोळखी पुरुषाचा डोक्यात दगड घालून खुन करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल हेमंत इनामे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द गुरुवार (दि.01) रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाची माहिती पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी तपासाची सूत्रे फिरवत मयत व्यक्तीची ओळख पटविणे बाबत तपास पथकास सुचना दिल्या होत्या. सदर आरोपी गुन्हा केल्यानंतर चाकण व भोसरी परिसरातुन रेल्वे स्टेशनला जावुन पळुन जाण्याच्या तयारीमध्ये असतांनाच त्यांना भोसरी परिसरातून रात्री उशिरा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
रांजणगाव MIDC परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा डोक्यात दगड घालुन खून करण्यात आल्याने औद्योगिक परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल तसेच स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलिस निरीक्षक यांच्या सुचनेप्रमाणे घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने भेट देवुन रांजणगाव पोलीस स्टेशन तपास पथकासह गुन्हयातील आरोपी व मयताबाबत तपास सुरु केला. घटनास्थळी शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी भेट देत तपासाबाबत तपास पथकास सुचना देवुन तपास पथके रवाना केली होती.
रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, यांनी मयताचे फोटो व वर्णनासह शोधपत्रीका कारेगावच्या हद्दीतील नागरीकांना दाखवत सोशल मिडीयावरती व्हायरल केली होती. सदर गुन्हयातील आरोपीतांबाबत व मयत व्यक्तीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसतांना तपास पथकाने सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करुन मयताच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता सदर मयत व्यक्तीचे नाव प्रशांता मायाधर साहु (वय 29) रा. बिंधानिमा, ता. तिगिरीया, जि.कटक, राज्य- ओरीसा असे असल्याचे निष्पन्न झाले. मयत व्यक्तीचे नाव निष्पन्न झाल्यानंतर तपास पथकाने अतिशय जलद गतीने तपासाची चक्रे फिरवत मयत व्यक्ती कोणाच्या संपर्कात होती याबाबत माहिती घेतली असता 1) प्रदिप कैलास पिडगे (वय 22 ) 2) भागवत रंगनाथ पिडगे (वय 23) दोघे (रा. आडगाव सुगाव, ता.पुर्णा, जि. परभणी) यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचा पोलिसांना संशय आला.
सदर आरोपी गुन्हा केल्यानंतर चाकण व भोसरी परिसरातुन रेल्वे स्टेशनला जावुन पळुन जाण्याच्या तयारीमध्ये असतांनाच त्यांना भोसरी परिसरातून रात्री उशिरा ताब्यात घेवुन गुन्हयाच्या कामी अटक करण्यात आली. त्यावेळी आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली असुन सदर आरोपींना आज शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवार (दि. 05) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पैशाच्या हव्यासापोटी घेतला जीव...
पोलिसांनी आरोपीकडे तपास केला असता आरोपी प्रदिप पिडगे हा WERIZE या सॅलरी फायनान्स कंपनीचे ऑनलाईन पर्सनल कर्ज काढुन देण्याचे काम करतो. त्याने यातील मयत प्रशांता साहु याला देखील 1,34,000 रु. ऑनलाईन कर्ज काढुन दिले होते. यातील आरोपीनी प्रशांता साहु याला दारु पिण्यासाठी निर्जन ठिकाणी घेवुन जावुन दारु पाजुन त्याच्या डोक्यात दगडं घालून त्याचा खुन केला असुन मयताचा मोबाईल घेवुन जावुन त्यावरुन नेट बँकिंकने आरोपी प्रदिप पिडगे याने स्वतःच्या बँक खात्यावर पैसे वर्ग केले आहेत.
सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, पुण्याचे अप्पर पोलिस अधिक्षक मितेश गट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, वैभव मोरे, संतोष औटी, विजय सरजिने, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ, यांनी केली असुन या गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे हे करत आहेत