रत्नागिरी : व्हेल माशाच्या उलटीची पुणे येथे विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या उलटीची किंमत 5 कोटी रुपये आहे. अटक करण्यात आलेले 3 जण दापोली येथील आहेत. राजेंद्र राकेश कोरडे (28), नवाज अब्दुल्ला कुरुपकर (24), अजिम महमुद काजी (50, तिघे रा. आंजर्ले, दापोली), विजय विठठल ठाणगे (56), अक्षय विजय ठणगे (26, दोघे रा. चैतन्यनगर, धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होणार असल्याची माहिती पुणे डेक्कन येथील स. पो. नि. कल्याणी पाडोळे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचला होता. फर्ग्युसन कॉलेज स्टॉप परिसरात तीघेजण संशयास्पद स्थितीत फिरत होते. तिघांना ताब्यात घेउन बॅगची तपासणी केली असता व्हेल माशाची उलटीचे दोन तुकडे आढळून आले. याबाबत विचारणा केली असता आम्ही व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी आणल्याचे त्यांनी सांगितले. याचवेळी अन्य दोघेजण ही उलटी विक्री करण्यासाठी मदत करायला आले होते. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. आरोपी राजेंद्र कोरडे याच्या ताब्यात असलेल्या काळया रंगाच्या बॅगेमध्ये व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा आढळून आला. त्याचे वजन 2 किलो 994 ग्रॅम इतके असून किंमत 2 कोटी 99 लाख 40 हजार इतकी आहे. तर दुसरा आरोपी नवाज अब्दुल्ला कुरुपकर याच्या ताब्यात असलेल्या मेहंदी रंगाच्या बॅगेत व्हेल माशाच्या उलटीचा 2 किलो 286 ग्रॅम वजनाचा तुकडा आढळला. त्याची किंमत 2 कोटी 28 लाख 60 हजार इतकी आहे. तर तिसरा आरोपी विजय ठाणगे याच्याकडील 35 हजार रुपये किंमतीची एक दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. असा एकूण 5 कोटी 28 लाख 35 हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.

व्हेल माशाची उलटी म्हणजे काय?

व्हेल माशाचा वावर खोल समुद्रात असतो. त्याला ब्लू व्हेल मासा म्हणून ओळखले जाते. हा मासा शारीरिक प्रक्रिेयेतून उलटी करतो. ती उलटी द्रव रुपात बाहेर पडते. मात्र ही उलटी पाण्यात विरघळत नाही. या उलटीचा गठ्ठा एकत्र होतो आणि तो पाण्यावर तरंगू लागतो. या उलटीला अंबर ग्रीस असे म्हटले जाते. अत्तर निर्मितीत त्याचा महत्वाचा घटक म्हणून या उलटीचा वापर केला जातो.