वरुडे: अमरावती तालुक्यातील मांगरुळी पेठ येथील नंदकिशोर घोरमाडे यांच्या मुलाचा विवाह सोहळा असल्याने दोन तरुण वरातीत सहभागी झाले होते. लग्नाच्या पूर्वसंध्येला नवरदेवाची वरात निघाली. नंतर ते कारने फिरायला गेले. मात्र कार अनियंत्रित होऊन त्यातील एकाचा अपघातीमृत्यू झाला. पुसलानजीक तो अपघात झाला होता. त्यातील गंभीर युवकाचा उपचारादरम्यान मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. तर दुसरा मित्र रात्री झोपला असता, त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

मांगरुळी येथील नंदकिशोर घोरमाडे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात सहभागी होण्याकरिता मनीष घोरमाडे (३०, रा. भिलापूर) हा मांगरुळीत आला होता. तर गावातीलच शुभम पांडे (२७) हासद्धा त्यात सहभागी झाला. सोमवारी सायंकाळी वाजत गाजत नवरदेव काढण्यात आला. मंगळवारी तो विवाह मोर्शी येथे होता. दरम्यान, मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास मनीष घोरमाडे हा मित्रांसह विनाक्रमांकाच्या कारने वरुड पुसला रोडने फिरावयास गेला. अचानक त्यांची कार अनियंत्रित होऊन धनोडी पुसला रस्त्यावर ती उलटली. यामध्ये तीन मित्र किरकोळ जखमी तर मनीष गंभीर जखमी झाला.

मनीषला तातडीने अमरावती हलविण्यात आले. सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे त्याच वरातीतून परत आलेला शुभम पांडे सोमवारी रात्री झोपी गेला. मंगळवारी सकाळी त्याला आईने उठविले, मात्र तो उठलाच नाही. म्हणून त्याला वरुडला खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दोन मित्रांचा मृत्यू झाल्याने मांगरुळीमध्ये शोककळा पसरली.