पुणे: मुंबई-बंगळुरु महामार्गावरील नवले पूल परिसरात अपघातांची मालिका सुरुच आहे. आज बुधवारी (दि. 30) नोव्हेंबर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एक पिकअप वाहन मागामार्गावर उलटला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. या पिकअप वाहनामध्ये एकूण 8 प्रवासी होते. यातील 4 जण जखमी झाले आहेत.
हा अपघात नऱ्हे नवले पुलाजवळ असणाऱ्या भूमकर पुलाजवळ घडला. याबाबत घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस तसंच हायवे पेट्रोलिंगचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साहाय्याने बाजूला केल. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे. माझ्या वाहनाला पाठीमागून ट्रकने धडक दिली. त्यामुळे आमचे वाहन पलटी झाले, अस पिकअप वाहन चालकाच म्हणण आहे.
दरम्यान गेल्या आठवड्यात सात दिवसांत आठ अपघात या परिसरात झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होते आहे.
20 नोव्हेंबर रोजी पुणेकरांनी अपघाती रात्र अनुभवली
नवले पुलावर रविवारी 20 नोव्हेंबर रोजी रात्री भीषण अपघात झाला होता. साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक समोरील वाहनांना धडकत पुढे गेला. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात तेल गळती झाल्याने वाहतूक बराच वेळ थांबवावी लागली होती. यात 24 गाड्यांचं नुकसान झालं होतं. यामुळे प्रचंडा वाहतूक कोंडी देखील झाली होती. या भीषण अपघातानंतर त्याच रात्री इतर दोन अपघात झाले होते. यात एकाचा मृत्यूदेखील झाला होता. त्यामुळे रविवारी पुणेकरांनी अपघाती रात्र अनुभवली होती.
22 नोव्हेंबर रोजी पुन्हा अपघात
नवले पुलावर 22 नोव्हेंबर रोजी पुन्हा अपघात झाला होता. या अपघातात तीन ते चार वाहनांचं नुकसान झालं होतं. 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण अपघाताच्या जागीच हा अपघात झाला. तीव्र उतारावर कंटेनरने दुभाजकाला धडक दिली. यात काही जण जखमी झाले. कात्रजकडून हा कंटेनर मुंबईच्या दिशेने जात होता. कंटेनरने रस्त्यामधील दुभाजकाला धडक दिली. यात कंटेनरचं देखील नुकसान झालं होतं.
26 नोव्हेंबरच्या अपघातात आयटेन आणि मर्सिडिज गाडीचं नुकसान
चार दिवसांपूर्वी नवले पुलावर झालेल्या अपघातात दोन गाड्यांच मोठ नुकसान झाल होत. 26 नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास साताऱ्याहून पुण्याकडे येणाऱ्या गाड्यांना अपघात झाला होता. यात आयटेन आणि मर्सिडीज गाडीच मोठ नुकसान झाल होत. नवले पुलावरील या सर्व अपघातांमध्ये गाड्यांचं मोठ नुकसान झाल आहे.
नवले पुलाने आतापर्यंत 66 जणांचा जीव घेतला...
2014 पासून आतापर्यंत दरी पूल ते नवले पूल आणि धायरी पूल या साडे तीन किलोमीटरच्या अंतरात तब्बल 185 अपघात झाले आहेत. या अपघातांमधे 66 जणांचा मृत्यू झाला असून 145 जण जखमी झाले आहेत.