भारतीय चलनात नाण्यांना एक वेगळं महत्वं आहे. सुट्या पैशांची अडचण या नाण्यांमुळेच कमी होते. मात्र, बरेचदा काही नाण्यांबाबत अफवा पसरतात आणि नागरिक ही नाणी स्वीकारण्यास नकार देतात. त्यातून समस्या सुटण्याऐवजी वाढतच जाते. त्यासाठी ‘आरबीआय’मार्फत वारंवार सूचनाही दिल्या जातात..

भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत अगदी एक पैशांपासून 20 रुपयांपर्यंतची नाणी वितरित केली गेली आहेत. आता त्यातील काही नाणी चलनातून बाद झाली आहेत. त्यात आता ठराविक काळातील, ठराविक पद्धतीने बनवलेली 1 रुपया व 50 पैशांच्या नाणी बंद करण्याचा निर्णय ‘आरबीआय’ने घेतल्याचे समोर आले आहे.

‘आरबीआय’ परत घेणार

'आयसीआयसीआय बँकेच्या शाखांबाहेर याबाबतची नोटीस लावण्यात आली आहे. ही ठराविक नाणी एकदा बँकेत जमा केल्यानंतर, बँकेकडून पुन्हा त्यांचे वितरण केले जाणार नाही. 

1990 व 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला ही नाणी मोठ्या प्रमाणात वापरली जात होती. मात्र, आता ही नाणी फार जुनी झाली आहेत. सध्या ही नाणी कायदेशीरदृष्ट्या वैध असली, तरी आता ती चलनातून बाहेर काढली जाणार आहेत. ‘आरबीआय’ ही नाणी संबंधित बँकांकडून परत घेणार असून ‘आरबीआय’च्या निर्देशांनुसार बँकेत एकदा जमा झालेली ही नाणी पुन्हा जारी केली जाणार नाहीत. 

बंद केलेली नाणी खालील प्रमाणे...

1 रुपयाची क्युप्रोनिकेल नाणी

50 पैशांची क्युप्रोनिकेल नाणी

25 पैशांची क्युप्रोनिकेल नाणी

10 पैशांची स्टेनलेस स्टीलची नाणी

10 पैशांची ॲल्युमिनियम-ब्राँझ नाणी

20 पैशांची ॲल्युमिनियम नाणी

10 पैशांची ॲल्युमिनियम नाणी

5 पैशांची ॲल्युमिनियम नाणी

'क्युप्रोनिकेल’ आणि ‘ॲल्युमिनियम’पासून बनवलेली एक रुपया व 50 पैशांची जुनी नाणी परत घेतली जातील. ही नाणी पुन्हा टांकसाळांकडे वितळवण्यासाठी पाठवली जाणार आहेत. त्यानंतर नवीन डिझाइनची नाणी जारी केली जाणार असून विविध आकारांतील थीम व डिझाइनची 50 पैसे, 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांची नाणी वैध असतील.