रत्नागिरी : जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने रत्नागिरी चेस अकॅडमी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कै. अनिल कानविंदे स्मृती रत्नागिरी जिल्हा जलद व अतिजलद निवड बुद्धिबळ स्पर्धांचे विजेतेपद अनुक्रमे अनिकेत रेडीज व यश गोगटे यांनी पटकावले. अत्यन्त चुरशीच्या झालेल्या जलद स्पर्धेत अनिकेत सह वरद पेठे, सौरिष कशेळकर व सोहम रुमडे या सर्वांनी ६ फेऱ्यांमध्ये ५ गुण प्राप्त केले परंतू सरस टायब्रेकच्या आधारावर अनिकेत विजेता ठरला व इतरांना अनुक्रमे द्वितीय ते चतुर्थ स्थानावर समाधान मानावे लागले. जलद स्पर्धेत १३ वर्षे वयोगटात ज्योतिरादित्य गडाळे, हृषीकेश कुंभारे तर ११ वर्षे वयोगटात सहर्ष टोकळे, यश काटकर व मुलींमध्ये आदिती पाटील, सई प्रभुदेसाई यांनी प्रथम दोन क्रमांक प्राप्त करत उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवली.
त्याच बरोबर आयोजित करण्यात आलेल्या अतिजलद स्पर्धेत यश गोगटे याने ७ फेऱ्यांमध्ये ६.५ गुणांसह प्रथम तर प्रत्येकी ५.५ गुणांसह वरद पेठे व अनिकेत रेडीज यांनी द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त केले. जलद व अतिजलद या दोन्ही स्पर्धांत प्रथम दोन क्रमांक प्राप्त बुद्धिबळपटूंची निवड मुंबई येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरिता करण्यात आली.
रत्नागिरीतील मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमी येथे पार पडलेल्या या स्पर्धांना चांगला प्रतिसाद लाभला. एकूण स्पर्धकांपैकी १३ खेळाडू आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त होते. पारितोषिक वितरण समारंभ जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी श्री. सुहास कामतेकर, चैतन्य भिडे यांचे हस्ते संपन्न झाला. पंच कामगिरी विवेक सोहनी यांनी पार पाडली.