आयटी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन यांनी नोकरी शोधणाऱ्या तरुणांना आशेचा किरण दाखवलाय. बंगळुरू टेक समिटच्या कार्यक्रमात बोलताना गोपालकृष्णन म्हणाले, 'भारतीय आयटी उद्योग महागाई आणि अमेरिकेतील मंदी यांसारख्या समस्यांदरम्यान आगामी काळात 2 लाख कर्मचारी नियुक्त करेल.'
गोपालकृष्णन पुढं म्हणाले, 'भारतीय आयटी उद्योग $220 बिलियन कमाईच्या आधारावर 8-10 टक्के दरानं वाढण्याची अपेक्षा आहे. AI/ML, Blockchain, Web 3.0, Metaverse सह तंत्रज्ञान क्षेत्र प्रगती करत आहे. त्यामुळं हा उद्योग वाढतच जाईल, असा माझा विश्वास आहे. लेऑफ मार्केटमध्ये फारच अल्पकालीन चढउतार आहेत. मी भविष्याबद्दल खूप आशावादी आहे.'
म्हैसूर, मंगळुरू, बेळगांव आणि हुबळी इथं छोटी कार्यालये उघडून कंपन्या आव्हानांवर मात करत असल्यानं आयटी क्षेत्र सुरक्षितपणे वाढणार असल्याचंही इन्फोसिसचे सह-संस्थापक म्हणाले. त्यांनी भारतातील सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस आणि ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स सारख्या खासगी उद्योजकांच्या अद्वितीय मॉडेलचं कौतुक केलं. वास्तविक, गेल्या काही महिन्यांत फेसबुक, मेटा, अॅमेझॉन सारख्या आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर लोकांना कामावरून काढून टाकलं आहे.